पैंजणांनी उलगडला हत्येचा गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2019 12:39 AM2019-10-17T00:39:56+5:302019-10-17T00:40:02+5:30

केरळमधून आरोपीला अटक : गुन्हे अन्वेषण विभागाला यश

Panjan confesses to murder | पैंजणांनी उलगडला हत्येचा गुन्हा

पैंजणांनी उलगडला हत्येचा गुन्हा

Next

डोंबिवली : एका अनोळखी महिलेच्या हत्येचे गूढ तिच्या पायातील पैंजणांच्या आधारे उलगडण्यात कल्याण गुन्हे अन्वेषण विभागातील पोलिसांना यश आले आहे. कोणताही पुरावा नसताना केलेल्या तपासानंतर पोलिसांनी आरोपी मन्सूर इसा अली शेख याला केरळमधील कोट्टायम येथून अटक केली आहे.
आयरेगावातील कोपर-वसई रेल्वेट्रॅकजवळ २९ मे रोजी एका अनोळखी महिलेचा मृतदेह आढळला होता. तिची गळा चिरून हत्या करण्यात आली होती. मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याने तिची ओळख पटवण्याचे पोलिसांपुढे आव्हान होते. याप्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. दरम्यान, या हत्या प्रकरणाचा समांतर तपास कल्याण गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी केला. आरोपीने कोणताही पुरावा मागे सोडलेला नव्हता, पण त्या महिलेची ओळख पटवण्यासाठी तिच्या पायातील चांदीचे पैंजण तपासाच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरले. पैंजणांवर तमिळ भाषेत ‘मलार’असे नाव लिहिले असल्याचे आढळले. इंटरनेटद्वारे तामिळनाडू राज्यातील ‘मलार’नामक ज्वेलर्स दुकानाची अचूक माहिती तपास पथकाकडून मिळवण्यात आली. यावर पोलीस निरीक्षक संजू जॉन यांच्या मार्गदर्शनानुसार पोलीस उपनिरीक्षक नितीन मुदगून, शरद पंजे यांचे पथक तामिळनाडू राज्याकडे रवाना झाले. तपास पथकाने त्याठिकाणी जाऊ न मलार ज्वेलर्स दुकानाचा शोध घेऊन त्यांच्याकडे चौकशी केली. दरम्यान, या ज्वेलर्समध्ये खरेदी करण्यासाठी मुस्लिम ग्राहक येत असल्याचे पथकाला समजले. त्यामुळे त्यांनी आसपासच्या शहरांतील मुस्लिम लोकवस्ती असलेले विभाग आणि खेड्यांमध्ये चौकशी सुरू केली. हत्या झालेल्या अनोळखी महिलेची ओळख पटवण्यासाठी तिच्या अंगावरील कपडे, पैंजण यांचा फोटो दाखवण्यास सुरुवात केली. यामध्ये पथकाला यश आले. येथील तिरुवन्नानमलाई राधापुरम या भागातील खलील शेख यांनी त्यांची पन्नासवर्षीय चुलत बहीण शाबिरा खान मुंबईतून १६ मेपासून बेपत्ता असल्याची माहिती पथकाला दिली. अखेर, अधिक चौकशीअंती अनोळखी मृत महिला ही शाबिरा खान असल्याचे उघड झाले. पोलिसांनी तिचा मोबाइल नंबर मिळवून त्याआधारे तपास केला असता शाबिरा कोपर रेल्वेस्टेशन येथे १४ आणि १६ मे रोजी आली असल्याचे आणि त्यानंतर तिचा मोबाइल बंद असल्याचे आढळून आले. अधिक माहिती काढली असता तिच्या परिचयाचा मन्सुर इसा अली शेख हाही कोपर रेल्वेस्थानकात आला असल्याचे व त्यानंतर मोबाइल बंद करून तो निघून गेल्याची माहिती मिळाली. त्यानेच ही हत्या केल्याचा संशय बळावल्याने त्याचा माग काढून त्याला केरळ येथील कोट्टायम येथून अटक करण्यात आली.

नांदवण्याच्या आग्रहामुळे हत्या
शाबिरा खान हिच्या पहिल्या पतीचे निधन झाले आहे. त्यानंतर, तिने मन्सुरशी लग्न केले होते. मन्सुरचेही हे दुसरे लग्न होते. त्याची पहिली बायको जिवंत आहे. दरम्यान, शाबिरा ही मन्सुरला कोपर येथील घरात एकत्र नांदू, असा आग्रह करीत होती, पण ते मन्सुरला मंजूर नव्हते. ती हट्टालाच पेटल्याने त्याने तिची हत्या केल्याचे तपासात उघड झाल्याचे पोलीस निरीक्षक जॉन यांनी सांगितले.

Web Title: Panjan confesses to murder

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.