ठाण्यात १९ लाखांचे दागिने लुबाडणारा अटकेत: मंत्री पंकजा मुंडे यांचा नातेवाईक असल्याची बतावणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2018 10:08 PM2018-07-02T22:08:38+5:302018-07-02T22:14:32+5:30
कार विक्री प्रकरणात साडे पाच लाखांचा गंडा घालणाऱ्या गजानन पालवे याला नौपाडा पोलिसांनी सराफाची १९ लाखांना फसवणूक केल्याप्रकरणी अटक केली आहे. राज्याच्या मंत्रि पंकजा मुंडे - पालवे यांचा नातेवाईक असल्याची बतावणी करीत त्याने आणखीही अनेकांची फसवणूक केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : राज्याच्या महिला व बालविकासमंत्री पंकजा मुंडे-पालवे यांचा दीर असल्याची बतावणी करत ठाण्यातील एका सराफाला १९ लाखांना गंडा घालणा-या गजानन पालवे (४७, रा. घोडबंदर रोड, ठाणे) या भामट्याला सोमवारी नौपाडा पोलिसांनी पुन्हा अटक केली. कारविक्री प्रकरणात त्याला यापूर्वीच अटक झाली होती. त्याला आता दुस-याही गुन्ह्यात न्यायालयातून ताब्यात घेण्यात आले आहे.
गजानन याने मंत्री पंकजा मुंडे-पालवे यांचे पती अमित यांचा चुलतभाऊ असल्याची बतावणी करत ठाण्यातील अनेक सराफांना गंडवले. सुरुवातीला त्याने विश्वास बसण्यासाठी आपल्या बोलीप्रमाणे व्यवहारही केले. परंतु, विश्वास संपादन केल्यानंतर त्याने गंडा घालण्यास सुरुवात केली. त्याचा साथीदार अक्षय चौधरी याची तो पंकजा यांचे पती अमितदादा अशी ओळख करून देत होता. अक्षयच्या मदतीनेच त्याने अनेकांना गंडा घातला. ठाण्याच्या पाचपाखाडीतील म्हसे-पाटील यांचीही त्याने दोन कारच्या खरेदीमध्ये पाच लाख ६४ हजारांमध्ये फसवणूक केली. याप्रकरणी तक्रार दाखल होताच २० जून रोजी त्याला पोलीस निरीक्षक संजय धुमाळ यांच्या पथकाने अटक केली. त्याची १ जुलै रोजी पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर त्याला न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले होते. दरम्यान, ठाण्याच्या विजय बेंद्रे या सराफाकडूनही त्याने २२ एप्रिल २०१८ रोजी सोन्याची बिस्किटे, नाणी आणि सोनसाखळी असे ५८० ग्रॅम ६४० मिली ग्रॅम वजनाचे १९ लाख ४० हजारांचे दागिने घेतले. त्या बदल्यात त्याने बेंद्रे यांना दिलेले १९ लाख ४० हजारांचे धनादेशही वटले नाही. याच प्रकरणात त्याचा नौपाडा पोलिसांनी सोमवारी न्यायालयातून ताबा घेतला. त्याला आता पुन्हा अटक करण्यात आली असून त्याच्याकडून आणखीही काही गुन्हे उघड होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. उपनिरीक्षक महेश कवळे हे याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.