पंडित जोशी रुग्णालयात बाळंतिणी, बाळांचे हाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2019 12:59 AM2019-06-29T00:59:13+5:302019-06-29T00:59:30+5:30
मीरा-भार्इंदर महापालिकेच्या वादग्रस्त ठरलेल्या पंडित भीमसेन जोशी रुग्णालयातील बाळंतिणी व नवजात बाळांसाठी गरम पाणी मिळत नसल्याने त्यांना चक्क चारचार दिवस अंघोळीविना राहावे लागत आहे.
मीरा रोड : मीरा-भार्इंदर महापालिकेच्या वादग्रस्त ठरलेल्या पंडित भीमसेन जोशी रुग्णालयातील बाळंतिणी व नवजात बाळांसाठी गरम पाणी मिळत नसल्याने त्यांना चक्क चारचार दिवस अंघोळीविना राहावे लागत आहे. शिवाय, अस्वच्छ स्वच्छतागृह, आवश्यक औषधे न देणे आदी अनेक भोंगळ प्रकारही समोर आले आहेत. एकूणच पालिका रुग्णालयात बाळंतिणी व त्यांच्या नवजात बाळांचेही हाल होत आहेत.
महापालिकेचे भार्इंदर येथील जोशी रुग्णालय नेहमीच वाद आणि टीकेमुळे वादग्रस्त राहिले आहे. रुग्णालयाची इमारत बांधली असली, तरी आजही पालिकेने आयसीयू, बालकांसाठीचे एनआयसीयू, शस्त्रक्रियागृहासारख्या आवश्यक सुविधाच अजून उपलब्ध करून दिलेल्या नाहीत. आवश्यक डॉक्टर तसेच यंत्रसामग्री, कर्मचारीवर्ग व औषधे आदींचा थांगपत्ता नसताना दुसरीकडे लोकप्रतिनिधी व अधिकारी मात्र दालनांपासून विविध कार्यक्रम, अनावश्यक कामे यासाठी कोट्यवधींची उधळपट्टी करत आले आहेत. यातून अनेकांचे बळी गेले असून अनेकांना उपचाराअभावी जाचाला सामोरे जावे लागले आहे. पालिकेच्या या निगरगट्ट कारभाराची दखल राष्ट्रीय व राज्य बालहक्क संरक्षण आयोगासह राज्य मानवी हक्क आयोगानेही घेतली आहे. सरकारनेही पालिकेच्या भोंगळ कारभारामुळे रुग्णालय ताब्यात घेऊन चालवण्यास नकार दिला आहे.
पालिका रुग्णालयाची रुग्ण व नातलगांसाठी छळछावणी झाल्याचा संताप नागरिकांमधून व्यक्त होत असताना पालिका रुग्णालयात बाळंतपणासाठी दाखल महिला व नवजात बाळांना अनेक यातनांना सामोरे जावे लागत आहे. प्रसूतिगृहातील गिझर खराब झाल्याचे कारण सांगून बाळंतिणींना अंघोळीसाठी गरम पाणीच दिले जात नाही. थंड पाणीच उपलब्ध असल्याने बाळंतिणींना नाइलाजाने अंघोळ न करताच चारचार दिवस काढावे लागत आहेत.
थंड पाण्याने अंघोळ करायची म्हटल्यास सर्दीतापाची लागण होऊन त्याची बाधा नवजात बाळाला होण्याची भीती असते. बाळंतिणीला गरम पाणी नसल्याने अंघोळ करणे शक्य होत नसल्याने घामामुळे इन्फेक्शन होण्याचीही धास्ती असते. नवजात बाळालाही गरम पाणी नसल्याने अंग पुसून घेतले जात नाही.
प्रसूतिगृहात तीन शौचकूप असून तीही अस्वच्छ आहेत. दुर्गंधी पसरलेली असते. अंघोळीसाठी एकच न्हाणीची खोली असून तीही गैरसोयीची आहे. याची दारेही जुनी लावली असल्याने खराब झाली आहेत. बाळंतिणींना स्वच्छतागृहात जाण्यासाठी परिचारिका व कर्मचाऱ्यांकडून स्लीपर घालण्यास मनाई केली जाते. उघड्या पायाने गार पाण्यात जाण्यामुळेही तब्येत बिघडण्याची भीती असते. कर्मचारी मात्र स्लीपर घालून वावरत असतात.
नवजात बाळाच्या नाभीला लावण्यासाठीची पावडर, क्रीम आदी असूनही कर्मचाऱ्यांकडून दिले जात नाही. त्यामुळे बाळ व आईसाठी ठेवल्या जाणाºया पावडर आदी औषधांचा गैरप्रकार होत असल्याची शक्यता बळावली आहे. अंघोळीसाठी गरम पाणी नाहीच, पण पिण्यासाठीही बाळ व बाळंतिणीस गरम पाण्याची सुविधा नाही. पालिकेच्या या कारभारावर नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.
याबाबत तात्काळ गरम पाण्यासाठी गिझर बसवण्याच्या सूचना कार्यकारी अभियंता दीपक खांबित यांना करणार आहे. त्याचबरोबर आवश्यक त्या सुविधा रूग्णालयात पुरवण्याचे निर्देशेही दिले जातील.
- बालाजी खतगावकर, आयुक्त
अंघोळीला व पिण्यास गरम पाणी नाही. त्यामुळे बाळ व बाळंतिणीला चार दिवस अंघोळीशिवाय राहावे लागले. स्वच्छतागृह अस्वच्छ असून बाळंतिणीस स्लीपरही घालू देत नाहीत. बाळंतीण व बाळाला लावण्यासाठी पावडर-क्रीम असूनही दिले जात नाही. कर्मचाºयांना काही सांगितले तर तक्रार करा, असे सरळ सांगतात. गोरगरिबांना वागणूक चांगली दिली जात नाही.
- माला पटेल, बाळंतिणीची आई