चरस तस्करी प्रकरणी ठाण्यातील पानटपरी चालकाला दहा वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2021 11:47 PM2021-01-12T23:47:32+5:302021-01-12T23:49:35+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : तब्बल दोन लाख ८० हजारांचे दोन किलो ८०० ग्रॅम वजनाच्या चरस तस्करीप्रकरणी ठाण्यातील अशोक ...
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: तब्बल दोन लाख ८० हजारांचे दोन किलो ८०० ग्रॅम वजनाच्या चरस तस्करीप्रकरणी ठाण्यातील अशोक जैसवार (३९, रा. रामनगर, ठाणे) या पानटपरी चालकाला दहा वर्षाच्या सश्रम कारावासाची आणि एक लाख रुपये दंडाची शिक्षा ठाण्याचे अतिरिक्त जिल्हा तथा विशेष न्यायाधीश हेमंत पटवर्धन यांनी मंगळवारी सुनावली आहे. तसेच दंड न भरल्यास एक वर्ष अतिरिक्त कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली.
ठाणे रेल्वे स्थानकाजवळील फलाट क्रमांक एकच्या बाजूला असलेल्या दादा पाटीलवाडीमध्ये जैसवार या पान टपरी चालकाकडे चरस विक्री होत असल्याची माहिती अमली पदार्थ विरोधी पथकाचे तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक अमोल वालझडे यांना मिळाली होती. त्याच माहितीच्या आधारे तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक मंदार धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली या पथकाने सापळा लावून १९ एप्रिल २०१५ रोजी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास जैसवार याला ताब्यात घेतले होते. त्यावेळी त्याने बेकायदेशीररित्या बाळगलेला दोन किलो ८०० ग्रॅम वजनाचा चरस त्याच्याकडून हस्तगत केला होता. याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध नार्कोटीक ड्रग्ज अॅन्ड सायकोट्राफीक सबस्टन्सेस अॅक्ट अॅन्ड रुल्स (एनडीपीएस) प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता. तेंव्हा पासून तो न्यायालयीन कोठडीत होता. नौपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल मांगले आणि अविनाश सोंडकर यांनी या प्रकरणाचा न्यायालयात पाठपुरावा केला होता. पैरवी अधिकारी
म्हणून जमादार चौगुले यांनी काम पाहिले. यामध्ये पाच साक्षीदार तपासण्यात आले. सरकारी वकील वर्षा चंदने यांनी आरोपीला शिक्षा मिळण्यासाठी जोरदार सरकारी पक्षाची जोरदार बाजू मांडली.
* अंमली पदार्थाच्या गुन्हयामध्ये ठाणे न्यायालयाने पहिल्यांदाच इतक्या मोठया दंडाची शिक्षा सुनावल्याचे बोलले जात आहे.