भाजपच्या धरणे आंदोलनाला पप्पू कलानींची हजेरी, राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कला ऊत
By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2022 04:51 PM2022-05-14T16:51:19+5:302022-05-14T16:53:33+5:30
आंदोलनाला भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी हजेरी लावल्याने, भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यात उत्साह निर्माण झाला.
उल्हासनगर : महापालिकेसमोरील भाजपच्या धरणे आंदोलनाला चक्क पप्पू कलानी यांनी हजेरी लावल्याने, भाजपच्या स्थानिक नेत्यात एकच खळबळ उडाली. शहरहिताचा मुद्दा असल्याने समर्थन करण्यासाठी आपण तेथे गेलो होतो. अशी प्रतिक्रिया कलानी यांनी देऊन, शहर भाजपमुक्त करण्याचा आपला संकल्प असल्याचा इशाराही यावेळी त्यांनी दिला.
उल्हासनगरातील धोकादायक इमारतीच्या पुनर्बांधणी प्रकरणी राज्य शासनाने नेमलेल्या समितीने गेल्या एका वर्षांपासून अहवाल प्रसिद्ध केला नाही. या निषेधार्थ शहर भाजपने महापालिकेसमोर शुक्रवारी धरणे आंदोलन केले. आंदोलनाला भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी हजेरी लावल्याने, भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यात उत्साह निर्माण झाला.
पप्पू कलानी यांनी चक्क धरणे आंदोलनाला भेट देऊन उपस्थितांची चर्चा करून धरणे आंदोलनाला समर्थन दिले. याप्रकारने कलानी भाजपच्या वाटेवर अशी चर्चा शहरात रंगली. मात्र, स्वतः पप्पू कलानी यांनी धोकादायक इमारतीचा प्रश्न शहरहिताचा असल्याने, धरणे आंदोलनाला समर्थन करण्यासाठी गेल्याची प्रतिक्रिया दिली. तर, ओमी कलानी यांनी शहरहिताच्या मुद्द्यावर पप्पु कलानी धरणे आंदोलन ठिकाणी गेले होते. शहर भाजपा मुक्त करण्याचा एककलमी कार्यक्रम आम्ही राबवित असल्याची माहिती युवानेते ओमी कलानी यांनी पत्रकारांना दिली आहे.
भाजपचे धरणे आंदोलनाचे आयोजक आमदार कुमार आयलानी व शहराध्यक्ष जमनुदास पुरस्वानी यांनी पप्पु कलानी यांनी धरणे ठिकाणीं येऊन नेहमी प्रमाणे स्टंटबाजी केल्याची प्रतिक्रिया दिली. तसेच त्यांच्या भाजप प्रवेशाचा मार्ग फेटाळून लावला. भाजपच्या कोणत्यातरी एका कार्यकर्त्यांनी पप्पु कलानी यांच्या गळ्यात भाजपचा टॉवेल टाकल्याने, त्यांनी भाजपात प्रवेश केला. असे कोणीही समजू नये. अशी प्रतिक्रिया आमदार कुमार आयलानी यांनी दिली. तसेच शहरहितार्थ धरणे आंदोलनाला पाठिंबा दिला असेलतर त्यांचे भाजपच्या वतीने स्वागत आहे. मात्र त्यांचा पेरॉल संपल्याने कलानी लवकर जेल मध्ये जाणार असल्याचे भाकीत आयलानी यांनी व्यक्त केले. एकूणच पप्पु कलानी यांच्या भाजप धरणे आंदोलनाला धावती भेट देऊन समर्थन दिल्याने, त्याचीच चर्चा शहरात होती.
प्रत्येक कार्यक्रमाला हजेरी
पप्पु कलानी यांनी शहर पिंजून काढले असून प्रत्येक कार्यक्रमाला ते हजेरी लावत असल्याने, शहरातील वातावरण कलानीमय झाले. याप्रकारने भाजपा नेत्याच्या पोटात गोळा उठल्याने चित्र आहे.