पप्पू कलानी यांच्या भेटीने उल्हासनगर भाजपातील वाट चव्हाट्यावर?
By सदानंद नाईक | Published: July 5, 2024 04:13 PM2024-07-05T16:13:32+5:302024-07-05T16:14:27+5:30
कलानी यांची ही सदिच्छा भेट असल्याची प्रतिक्रिया रामचंदानी यांनी देऊन याप्रकारावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.
उल्हासनगर : भाजप शहरजिल्हाध्यक्ष प्रदीप रामचंदानी यांच्या कार्यालयाला माजी आमदार पप्पू कलानी यांनी भेट दिल्याने, पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला. पक्षाच्या काही पदाधिकाऱ्यांनी पक्षाविरोधी भूमिका घेणाऱ्या विरोधात कारवाई करण्याची मागणी वरिष्ठ नेत्याकडे केली. तर कलानी यांची ही सदिच्छा भेट असल्याची प्रतिक्रिया रामचंदानी यांनी देऊन याप्रकारावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.
उल्हासनगरचे राजकारण माजी आमदार पप्पू कलानी यांच्या भोवती फिरत आहेत. गेल्या विधानसभा निवरणुकी वेळी कलानी जेलमध्ये असतांना त्यांच्या धर्मपत्नी ज्योती कलानी व कुमार आयलानी यांच्यात विधानसभा निवडणुकीत सामना होऊन आयलानी यांचा अवघ्या १९०० मतांनी आमदार पदी निसटा विजय झाला होता. यावेळी मात्र ओमी अथवा पंचम कलानी विरुद्ध कुमार आयलानी असा सामना रंगण्याची शक्यता आहे. अश्यावेळी पप्पू कलानी यांनी भाजप शहरजिल्हाध्यक्ष प्रदीप रामचंदानी यांच्या कार्यालयाला भेट दिली. भेटी वेळी भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष व उल्हासनगर विधानसभा अध्यक्ष जमनुदास पुरस्वानी व कलानी समर्थक माजी नगरसेवक मनोज लासी, कमलेश निकम, शिवाजी रगडे आदीजन उपस्थित होते. कलानी यांच्या भेटीने मात्र भाजपातील वाद चव्हाट्यावर येण्याची शक्यता निर्माण झाली.
आमदार कुमार आयलानी यांचे समर्थक व पक्षाचे पदाधिकारी प्रकाश तलरेजा यांच्यासह अन्य पदाधिकार्यांनी कलानी व रामचंदानी यांच्या भेटीनंतर, थेट वरिष्ठांकडे निवेदन पाठवून पक्षा विरोधात भूमिका घेणाऱ्यांवर कारवाईची मागणी केली. प्रदीप रामचंदानी यांनी पक्षाने विश्वास दाखविल्यास आमदार पदासाठी निवडणूक लढण्यास इच्छुक असल्याचे यापूर्वीच स्पष्ट केले. तर आमदार कुमार आयलानी यांनी आपण पक्षाचा सर्वसामान्य कार्यकर्ता असून पक्ष ज्यांना तिकीट देईल, त्याचा प्रचार करणार असल्याची प्रतिक्रिया दिली. तसेच पक्षाच्या वतीने शहरातील गुन्हेगारी खत्म करण्याची मागणी शासनाकडे केली जात असतांना, दुसरीकडे पक्षाचे शहरजिल्हाध्यक्ष प्रदीप रामचंदानी यांनी गुन्हेगारीवृत्तीच्या नागरिकांना किती महत्त्व द्यावे. हे सांगायला नको. असे म्हटले आहे.
भाजपातील कलह आयलानी विरुद्ध?
भाजपच्या श्रेष्टीने वेळोवेळी कुमार आयलानी यांच्यावर विश्वास दाखविल्याने, ते दोनदा आमदार म्हणून निवडून आले, यापूर्वी त्यांनी महापौर, उपमहापौर यांच्यासह शहरजिल्हाध्यक्ष पदे उपभोगले आहे. तसेच त्यांच्या धर्मपत्नी मीना आयलानी नगरसेवक व महापौर पदी राहिल्या आहेत. आयलानी डोईजड होऊ नये म्हणून भाजपात दोन गट असल्याचे पक्षाच्या भूमिकेवरून अनेकदा उघड झाले आहे.