वसंतराव डावखरे व्याख्यानमालेत पराग बद्रिके अन् अनन्या म्हात्रे प्रथम
By प्रज्ञा म्हात्रे | Published: November 9, 2022 01:42 PM2022-11-09T13:42:58+5:302022-11-09T13:44:47+5:30
उत्तम वक्तृत्वासाठी सातत्याने नवनवीन लोकांबरोबर बोलत राहिले पाहिजे. बोलण्याबरोबरच दुप्पट वाचले पाहिजे.
ठाणे : सध्या फॉरवर्डच्या काळात तरुण पिढीचे शब्दांशी नातं तुटत आहे. दिवंगत वसंतराव डावखरे यांच्या नावाने होणाऱ्या वक्तृत्व स्पर्धांच्या माध्यमातून पुन्हा शब्दांशी नाते जोडले जाईल, असे प्रतिपादन भाजपाचे प्रदेश प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी व्यक्त केले. दरम्यान, कै. वसंतराव डावखरे राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेत वरिष्ठ गटात पराग बद्रिके व कनिष्ठ गटात अनन्या म्हात्रे यांनी प्रथम क्रमांक पटकावून प्रत्येकी दहा हजार रुपयाचे बक्षीस जिंकले.
विधान परिषदेचे माजी उपसभापती दिवंगत वसंतराव डावखरे साहेबांच्या जयंतीनिमित्ताने समन्वय प्रतिष्ठानतर्फे ठाण्यातील के. बी. पी. महाविद्यालयात भरविलेल्या राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेचा समारोप झाला. आमदार निरंजन डावखरे, माजी खासदार संजीव नाईक, भाजपाच्या प्रदेश सरचिटणीस माधवी नाईक आणि प्रदेश प्रवक्ते केशव उपाध्ये यांच्या हस्ते विजेत्यांना बक्षिसे देण्यात आली.
यावेळी महापालिकेतील माजी गटनेते मनोहर डुंबरे, प्रसिद्ध लेखक शिरीष लाटकर, भाजपाचे शहर सरचिटणीस विलास साठे, मनोहर सुगदरे, सचिन मोरे आदींची उपस्थिती होती. या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून प्रसिद्ध कवी अरुण म्हात्रे, हर्षदा बोरकर, निर्मोही फडके, मंदार टिल्लू आदींनी काम पाहिले. या स्पर्धेत वरिष्ठ गटात यश पाटील याने द्वीतीय, श्रुती बोरस्तेने तृतीय आणि विवेक वारभुवन याने उत्तेजनार्थ बक्षीस जिंकले तर कनिष्ठ गटात द्वितीय क्रमांकावर रागिणी भोसले, तृतीय क्रमांकावर प्रियांका दळवी आणि उत्तेजनार्थ म्हणून मनस्वी माने यांना बक्षीस देण्यात आले.
उत्तम वक्तृत्वासाठी सातत्याने नवनवीन लोकांबरोबर बोलत राहिले पाहिजे. बोलण्याबरोबरच दुप्पट वाचले पाहिजे. तर पाच ते सहापट ऐकले पाहिजे. वक्तृत्वासाठी आत्मविश्वासही महत्वाचा असून, शब्दांची मांडणीही योग्य पद्धतीने करावी, अशी सुचना उपाध्ये यांनी तरुणांना केली. प्रत्येक भाषणाच्या वेळी आपल्या समोर जनसमुदाय कोणत्या पद्धतीचा आहे. ते ध्यानात घेण्याबरोबरच सखोल अभ्यास करून भाषण करावे. अशा पद्धतीने तुम्हा वक्तृत्वात यश मिळेल, असे उपाध्ये यांनी सांगितले.
महाविद्यालयातील तरुण-तरुणींना मनातील विचार व्यक्त करण्यासाठी व्यासपीठ देण्याचा मुख्य उद्देश ठेवून स्पर्धा भरविण्यात आली होती. उत्तम वक्तृत्वाच्या माध्यमातून मुलांना भविष्य घडविता येऊ शकते. यापुढील काळातही समन्वय प्रतिष्ठानतर्फे तरुणांच्या प्रगतीसाठी स्पर्धांसह विविध उपक्रम राबविण्यात येतील, असे आमदार निरंजन डावखरे यांनी प्रास्ताविकात सांगितले. यावेळी संजीव नाईक, माधवी नाईक यांचीही भाषणे झाली. आकाश राऊत यांनी सुत्रसंचालन व स्पर्धेचे नियोजन केले.
'वसंतराव डावखरेंनी अनेक वक्ते घडविले'
विधान परिषदेच्या उपसभापतीपदावर कार्य करीत असताना वसंतराव डावखरे यांनी सभागृहातून अनेक यशस्वी वक्ते घडविले. एखादा आमदार चांगल्या पद्धतीने बोलत असल्यास, त्याला ते भाषणासाठी वेळ वाढवून देत असत. तर एखादा सदस्य मुद्द्यावरून भरकटला, तर ताबडतोब विषय थांबवित असत. त्यांच्या या पद्धतीमुळे अनेक नवोदीत आमदारांना आत्मविश्वास वाढला होता, अशी आठवण भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी सांगितली. तर कवी अरुण म्हात्रे यांनी वसंतराव डावखरेंच्या भाषणाचे वैशिष्ट्य नमूद केले. सभा असो वा बैठक, ते बोलताना सर्व समुदायाला सामावून घेत होते. त्यामुळे त्यांचे भाषण लोकांच्या मनाला भिडत होते, असे म्हात्रे यांनी सांगितले.