समांतर बसला श्रेयवादाचे टायर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2017 06:37 AM2017-07-24T06:37:17+5:302017-07-24T06:37:17+5:30

रेल्वेला समांतर रस्त्यावरून श्रावणी सोमवारपासून बस सुरू करण्यास केडीएमटी उपक्रमाला मुहूर्त मिळाल्याने आता त्यांच्या श्रेयासाठी

Parallel bus farewell tire! | समांतर बसला श्रेयवादाचे टायर!

समांतर बसला श्रेयवादाचे टायर!

googlenewsNext

प्रशांत माने/ लोकमत न्यूज नेटवर्क
कल्याण : रेल्वेला समांतर रस्त्यावरून श्रावणी सोमवारपासून बस सुरू करण्यास केडीएमटी उपक्रमाला मुहूर्त मिळाल्याने आता त्यांच्या श्रेयासाठी व्रतवैकल्ये सुरू झाली आहेत. भाजपाने श्रावणी सोमवारच्या सकाळीच या बससेवेला झेंडा दाखवायचा ठरवला आहे, तर शिवसेनेने मात्र ‘नो गाजावाजा’ म्हणत या आटपाटनगरातून माघार घेतली आहे. सत्ताधाऱ्यांतील श्रेयवाद अंगलट येण्याची शक्यता असल्याने केडीएमटी उपक्रमाने मात्र शुभारंभाचा कोणताही कार्यक्रम आयोजित न करता पांढरे निशाण फडकावले आहे.
रेल्वेला समांतर रस्त्यावर बससेवा सुरू करण्यासंदर्भात शिवसेनेचे सदस्य मनोज चौधरी यांनी जूनच्या पहिल्या आठवडयात झालेल्या परिवहन समितीच्या बैठकीत प्रस्ताव मांडला. त्याला सर्वपक्षीय सदस्यांनी हिरवा कंदील दाखवल्याने श्रावणी सोमवारपासून या मार्गावरून बससेवा सुरू होत आहे.
पण त्यावरून सत्ताधारी शिवसेना-भाजपामध्ये श्रेयवादाची लढाई सुरू आहे. माझ्या प्रस्तावामुळे बस सुरू झाल्याचा शिवसेनेचे परिवहन सदस्य मनोज चौधरी यांचा दावा आहे. मात्र २०१५ मध्ये निवडून आल्यानंतर लागलीच मी समांतर रस्त्यावरून बससेवा सुरू करण्याचे पत्र दिले होते आणि याबाबत सातत्याने पाठपुरावा केल्याने ही सेवा सुरू होत असल्याचे मत कचोरे प्रभागाच्या भाजपाच्या स्थानिक नगरसेविका रेखा चौधरी यांनी व्यक्त केले. त्यामुळे सोमवारी भाजपातर्फे गावदेवी चौकात बसचे स्वागत केले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. मनोज चौधरी यांनी मात्र मी श्रेयासाठी बस सुरू नाही केली, तर नागरिकांच्या सोयीसाठी केल्याची प्रतिक्रिया ‘लोकमत’ला दिली.
दरम्यान, केडीएमटी उपक्रमाचे महाव्यवस्थापक देवीदास टेकाळे यांच्याशी संपर्क साधला असता उपक्रमाकडून बससेवेच्या शुभारंभाचा कोणताही कार्यक्रम आयोजित करण्यात आला नसल्याचे सांगत श्रेयवादाबाबत बोलण्यास त्यांनी नकार दिला.

बसथांबे कागदावरच
कल्याण स्थानक, बैलबाजार, फुलमार्केट, रहेजा कॉम्प्लेक्स, पत्रीपूल, मोहन सृष्टी, अंबरप्रीत चौक, कचोरे गाव, साईराज पार्क, आयसीआयसीआय बँक, म्हसोबा चौक, कर्नाटका बँक, हरिप्रसाद दर्शन, बंदिश पॅलेस, आजदे गांव, शेलार चौक, मंजुनाथ विद्यालय, टिळक चौक, ब्राह्मण सभा, डोंबिवली स्थानक या बसथांब्यांवर अजून साधे फलकही लावलेले नाहीत.


मग इतका विलंब का?
रेखा चौधरी यांनी बससेवा सुरू करण्याचे पत्र २०१५ ला दिले, तेव्हा परिवहन सभापती भाजपाचाच होता. मग त्यांच्या पत्रावर तत्काळ अंमलबजावणी का झाली नाही? बस सुरू व्हायला २०१७ साल का उजाडले? असा सवाल शिवसेनेचे सदस्य मनोज चौधरी यांनी विचारला. लवकरच बसथांबेही लागतील. त्यासाठी पाठपुरावा सुरू असल्याचे चौधरी यांनी सांगितले.

‘प्रवाशांचे वचन पाळले’ : गेली दोन वर्षे बसससाठी माझा सातत्याने पाठपुरावा सुरू होता. नगरसेविका म्हणून निवडून आल्यानंतर सोसायट्यांच्या बैठकांमधील मागणीनुसार मी या मार्गावरून बससेवा सुरू करण्याचे वचन दिले होते, त्याची पूर्तता होते, यात मला आनंद आहे. श्रेय कोणालाही घेऊ दे. मला नागरिकांची समस्या सोडवायची होती आणि ती मी सोडवली, असे भाजपच्या स्थानिक नगरसेविका रेखा चौधरी यांनी स्पष्ट केले.

Web Title: Parallel bus farewell tire!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.