परमवीर सिंग खंडणी प्रकरण; तपास आता सीबीआय करणार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2022 12:08 PM2022-11-18T12:08:54+5:302022-11-18T12:10:15+5:30
Parambir Singh: मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमवीर सिंग यांच्यासह २८ जणांविरुद्ध ठाण्यातील ठाणेनगर पोलीस ठाण्यात जुलै २०२१ मध्ये दाखल गुन्ह्याचा तपास सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (सीबीआय) वर्ग झाला.
ठाणे : बांधकाम व्यावसायिक केतन तन्ना, क्रिकेट बुकी सोनू जलान आणि रियाज भाटी यांच्याकडून साडेतीन कोटींची कथित खंडणी उकळल्याप्रकरणी मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमवीर सिंग यांच्यासह २८ जणांविरुद्ध ठाण्यातील ठाणेनगर पोलीस ठाण्यात जुलै २०२१ मध्ये दाखल गुन्ह्याचा तपास सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (सीबीआय) वर्ग झाला. गुरुवारी या प्रकरणाचा तपास सीबीआयने आपल्याकडे घेतला.
सिंग यांच्याविरोधात मुंबईतील मरिन ड्राइव्ह, गोरेगाव, अकोला आणि ठाणे येथील कोपरी आणि ठाणेनगर या पोलिस ठाण्यांमध्ये असे एकूण पाच वेगवेगळे गुन्हे (एफआयआर) दाखल झाले आहेत. आपल्याला सर्वोच्च न्यायालयाने याप्रकरणी संरक्षण द्यावे, अशी मागणी सिंग यांनी केली होती. त्यानुसार दि. २४ मार्च २०२२ रोजी या प्रकरणाचा निकाल देतेवेळी सिंग यांच्या विरोधातील पाचही एफआयआर सीबीआयकडे वर्ग करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. आतापर्यंत मरिन ड्राइव्ह, गोरेगाव, अकोला आणि ठाण्यातील कोपरी या चार ठिकाणांचे एफआयआर सीबीआयकडे वर्ग झाले आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या याच आदेशनुसार, ठाणे नगर पोलिस ठाण्यातील एफआयआरदेखील आता सीबीआयकडे वर्ग झाला. प्रक्रियेनुसार सीबीआयने ठाणेनगर पोलिसांच्या एफआयआरच्या आधारे स्वत:चा एफआयआर नोंदविली असून, याप्रकरणी पुढील तपास केला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
काय आहे ठाणेनगरचे प्रकरण?
केतन तन्ना यांच्यासह तिघांनी ठाणेनगर पोलिस ठाण्यात ३० जुलै २०२१ रोजी याबाबतची तक्रार दिली होती. सिंग यांच्या इशाऱ्यावरूनच एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आपल्याला धमक्या देऊन आपल्याकडून साडेतीन कोटी रुपये उकळल्याचा जबाब तन्ना यांनी नोंदवला होता.
कुख्यात गुंड रवि पुजारी याचेही नाव होते. परमबीर आणि इतर जणांवर जबरी चोरी, धमकावणे, खंडणी यांसारख्या दहाहून अधिक कलमांतर्गत हा गुन्हा दाखल झाला होता. याच प्रकरणात ठाणे न्यायालयाने परमवीर सिंग यांना अटक वॉरंटही काढले होते. अखेर ते या प्रकरणात न्यायालयात हजर झाल्यानंतर त्यांची जामिनावर सुटका झाली होती.