परमबीर सिंग खंडणीखोर, त्यांच्यासह २८ आरोपींना कडक शिक्षा व्हावी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2021 12:14 AM2021-11-27T00:14:24+5:302021-11-27T00:26:28+5:30
लोकांकडून पैसे घेणे, खोट्या केसेस दाखल करणे आणि मकोका लावणे हाच उद्योग मुंबई आणि ठाण्याचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : लोकांकडून पैसे घेणे, खोट्या केसेस दाखल करणे आणि मकोका लावणे हाच उद्योग मुंबई आणि ठाण्याचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केला आहे. ते खंडणीखोर आहेत. त्यांच्यासह २८ आरोपींवर कडक कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी ठाणेनगर पोलीस ठाण्यात खंडणीची तक्रार दाखल करणारे क्रिकेट बुकी सोनू जालान यांनी शुक्रवारी केली. राज्याचे पोलीस महासंचालक संजय पांडे यांच्याकडे आपण नि:पक्ष तपासासाठी पत्र देणार असल्याचेही ते म्हणाले.
जालान यांच्याकडून तब्बल साडेतीन कोटींची खंडणी उकळल्याचा आरोप परमबीर यांच्यावर आहे. याच प्रकरणाच्या चौकशीसाठी शुक्रवारी सकाळपासून ते ठाणेनगर पोलीस ठाण्यात हजर झाले होते. याअनुषंगाने सोनूदेखील ठाणेनगर पोलीस ठाण्याच्या आवारातच वकील सागर कदम यांच्यासह ठाण मांडून उभे होते. ते पुढे म्हणाले, २०१८ मध्ये ठाणे पोलीस आयुक्त असताना परमबीर हे वादग्रस्त अधिकारी म्हणून राहिले आहेत. गँगस्टर रवी पुजारी हादेखील सिंग यांचाच भागीदार आहे. कोणत्याही केसमध्ये रवी पुजारी यांचे नाव टाकले जाते. यातून कोणालाही मकोका लावण्यासाठी पुजारीचे नाव घेतले जायचे. आपल्यालाही दहा कोटींची मागणी करुन तीन कोटी रुपये घेतले. त्यावेळी सिंग यांच्यासह प्रदीप शर्मा आणि राजकुमार कोथमिरे हे अधिकारीही होते, असेही ते म्हणाले. परंतु, आता ठाणे पोलिसांकडून सुरु असलेल्या चौकशीवर नाराज असल्याचे ते म्हणाले. आपण नेमलेले सरकारी वकील प्रदीप घरत यांना पोलीस कोणतेही सहकार्य करीत नाहीत. पोलिसांच्या या नाकर्तेपणामुळेच दोन आरोपींना जामीन झाला. तसेच इतरांच्याही जामिनाचा मार्ग मोकळा झाल्याचे सांगत सोनू यांनी ठाणे पोलिसांच्या तपासावर अविश्वास व्यक्त केला आहे.
तपास अधिकारी सरकारी वकीलांना कोणतीच माहिती देत नाहीत. त्यामुळेच दोन आरोपींचा जामीन झाला. संजय पुनामिया याला वैद्यकीय कारणास्तव तर तारिक परवीन याला तांत्रिक कारणामुळे जामीन झाला. तरीही आम्हाला न्याय मिळेल, असा विश्वास वाटतो, असेही जालान म्हणाले.