अंबरनाथमधील कान्होरच्या केंद्र शाळेची परसबाग बाेलकी; राज्यस्तरासाठी निवड!

By सुरेश लोखंडे | Published: February 5, 2024 06:46 PM2024-02-05T18:46:42+5:302024-02-05T18:47:05+5:30

या शाळांच्या स्पर्धेत जिल्हास्तरीय प्रथम क्रमांक पटकवलेल्या या शाळेची आता राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

Parasbag Bolaki of Kanhor's Center School in Ambernath; Selected for State Level | अंबरनाथमधील कान्होरच्या केंद्र शाळेची परसबाग बाेलकी; राज्यस्तरासाठी निवड!

अंबरनाथमधील कान्होरच्या केंद्र शाळेची परसबाग बाेलकी; राज्यस्तरासाठी निवड!

ठाणे : निसर्गासारखा गुरू नाही. निसर्ग आयुष्यभर आपल्याला काही ना काही देतच असतो. त्याच्याकडून शिकण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत. पण हे सर्व कधी शक्य होईल, जेव्हा त्याच्या सानिध्यात आपण जाऊ, त्याला समजून घेऊ, त्याच्याशी मैत्री करू म्हणूनच मुलांना निसर्गाची ओळख आगळ्यावेगळ्या पध्दतीने करून द्यायच्या दृष्टीने अंबरनाथ तालुक्यातील कान्हाेर येथील जि.प. केंद्र शाळेची परसबाग बाेलकी ठरली आहे. या शाळांच्या स्पर्धेत जिल्हास्तरीय प्रथम क्रमांक पटकवलेल्या या शाळेची आता राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

या शाळेतीच्या परसबागेतील प्रत्येक झाडाला शिक्षक अमोल पेन्सलवार यांनी क्यूआर कोड दिला आहे. तो क्यूआर कोड स्कॅन केल्यानंतर, प्रत्येक झाड स्वतः बोलू लागते. आपली विशेषता सांगू लागते. या उपक्रमास राज्य शासनाकडून आयोजित स्पर्धेत जिल्हास्तरावरील शालेय परसबाग निर्मिती स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळाला असून राज्यस्तरावर देखील निवड झाली आहे. बोलकी परसबाग शाळेच्या आवारात साकारण्यासाठी सक्रीय असलेल्यांमध्ये शाळेतील विद्यार्थी, शाळेच्या मुख्याध्यापिका कमल फसले, शिक्षक तसेच शालेय पोषण आहार शिजवणाऱ्या ज्योती राऊत, मदतनीस तारा भोपी, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष जगदीश राऊत, उपाध्यक्षा अपेक्षा झुंजारराव आदींचा समावेश आहे.

झाडावरील कोड स्कॅन केल्यानंतर झाडाचे नाव, उपयोग, गुणधर्म, पोषणमूल्ये इत्यादी माहिती स्कॅनरच्या माध्यमातून मिळते. या परसबागेत पळस, आंबा, चिकू, पेरु, कडुलिंब तसेच अळूची पाने, काकडी, भोपळा, दोडकी, कारली, डोंगर, चवळी, कढीपत्ता, तोंडली, अडुळसा, तुळस, कोरफड, पानफुटी अशी नानाविध वनस्पती लावण्यात आल्या आहेत. दैनंदिन शिक्षणात तंत्रज्ञानाचा वापर करून पारंपरिकतेला आधुनिकतेची जोड दिल्यास शिक्षण प्रभावी बनते व विद्यार्थीही आवडीने सहभागी होतात. अर्थात जीवनाभिमुख शिक्षण देणे हा या उपक्रमाचा मूळ उद्देश आहे.

या परसबागेत सेंद्रिय खतांचाच वापर केलेला असल्यामुळे विद्यार्थ्यांना सेंद्रिय शेतीचे महत्त्व प्रत्यक्ष अनुभवातून मिळत आहे. मुलांना फळभाज्या, पालेभाज्या, औषधी वनस्पती यांची ओळख होऊन त्यांचे गुणधर्म, पोषणमूल्य यांची देखील माहिती मिळत आहे – शिक्षक, अमोल पेन्सलवार
 

Web Title: Parasbag Bolaki of Kanhor's Center School in Ambernath; Selected for State Level

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.