मुख्यमंत्री चषक कबड्डी स्पर्धेत परभणी, पिंपरी-चिंचवड, कोल्हापूरचा विजय
By प्रज्ञा म्हात्रे | Published: December 3, 2023 03:55 PM2023-12-03T15:55:59+5:302023-12-03T15:59:26+5:30
धर्मवीर आनंद दिघे क्रीडांगणात रंगली स्पर्धा
प्रज्ञा म्हात्रे, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: परभणी, पिंपरी चिंचवड, कोल्हापूर आदी संघांनी साखळी लढतीत सोपे विजय मिळवत प्रशांत जाधव फाऊंडेशन आणि विठ्ठल क्रीडा मंडळ आयोजित कुमारांच्या सुवर्ण महोत्सवी महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद आणि निवड चाचणी कबड्डी स्पर्धेच्या मुलांच्या गटात बाद फेरीत खेळण्याची आशा कायम राखली आहे. धर्मवीर आनंद दिघे क्रीडांगणात सुरू असलेल्या स्पर्धेच्या सामन्यात परभणी संघाने ठाणे ग्रामीण संघाचा ४१-२९ असा पराभव केला. सामन्याच्या पूर्वार्धात परभणी संघाने २०-१६ अशी आघाडी घेत सामन्यावर पकड मिळवली होती. साखळी लढतीतील पहिल्या सामन्यात ठाणे ग्रामीण संघाने पिछाडीवरून बाजी पालटवली होती. तशाच खेळाची त्यांच्याकडून अपेक्षा असताना या सामन्यात मात्र त्यांनी निराशा केली. बाबुराव जाधव आणि विजय तरेने परभणी संघाला १२ गुणांनी विजय मिळवून देण्यात महत्वाची भूमिका बजावली.
अन्य लढतीत पिंपरी चिंचवड संघाने सातारा संघावर ५३-३७ अशी सरशी मिळवली. पिंपरी चिंचवड संघाच्या विजयात आर्यन राठोड आणि कृष्णा चव्हाण चमकले. पराभूत संघाकडून चैतन्य पाटील आणि अथर्व सावंत चमकले. पहिल्या डावात चांगला खेळ करणाऱ्या बीड संघाला कोल्हापूर संघाकडून ३९-२१ असा १८ गुणांनी पराभव पत्करावा लागला. मध्यंतरापर्यंतच्या खेळात बीड संघाकडून झालेल्या प्रतिकारामुळे कोल्हापूर संघाला १३-१२ अशी नाममात्र आघाडी मिळाली होती. दुसऱ्या डावात कोल्हापूरच्या खेळाडूंनी आपला खेळ उंचावत संघाला मोठया फरकाने विजय मिळवून दिला. साहिल पाटील, वैभव राबडे, धनंजय भोसले यांनी संघाला विजयाचा मार्ग दाखवला.
मुलींच्या लढतीत पिछाडी भरुन काढत ठाणे ग्रामीण संघाने पुणे शहर संघाला चकवले. पहिल्या डावात १२-१६ असे चार गुणांनीउ मागे पडलेल्या ठाणे संघाने सामन्याच्या शेवटी २९-२५ अशी बाजी पालटवली. निधी रांजोळे, यातीक्षा बावाडे, सानिया गायकवाड, वेदिका ठाकरे यांनी ठाणे संघाला यश मिळवून दिले. पुणे शहर संघाकडून प्रज्ञा कासार, अंकिता पिसाळ आणि तनिष्का शिंदेने चांगला खेळ केला. या गटातील अन्य लढतीत सोलापूर संघाने बीड संघाचा ६८-२६ असा धुव्वा उडवला तर सिंधुदुर्ग संघाने प्रज्ञा शेट्टे, रिद्धी हडकर आणि पलक गावडेच्या आक्रमक खेळामुळे हिंगोली संघावर ८५-१४ असा मोठा विजय मिळवला.