पालकांनी केले प्राचीचे नेत्रदान
By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2018 05:10 AM2018-08-06T05:10:10+5:302018-08-06T05:10:25+5:30
एकतर्फी प्रेमातून ठाणे पूर्व भागातील कोपरी येथील प्राची विकास झाडे (२१) या तरुणीचा पाठलाग करून तिची निर्घृण हत्या करणाऱ्या काल्हेर येथील आरोपी आकाश पवार (२५) याला रविवारी ठाणे न्यायालयाने १० आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
ठाणे : एकतर्फी प्रेमातून ठाणे पूर्व भागातील कोपरी येथील प्राची विकास झाडे (२१) या तरुणीचा पाठलाग करून तिची निर्घृण हत्या करणाऱ्या काल्हेर येथील आरोपी आकाश पवार (२५) याला रविवारी ठाणे न्यायालयाने १० आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. दरम्यान, पालकांच्या इच्छेनुसार, प्राचीचे डोळे दान करण्यात आले आहेत.
शनिवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास प्राची दुचाकीवरून कामावर जात होती. त्याचवेळी पाठीमागून दुचाकीने आलेल्या आकाशने तिच्यावर चाकूने हल्ला करून तिचा खून केला. या हल्ल्यानंतर त्याने खासगी बसखाली आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र, तो बचावला. आरोपीने तिच्या पाठीवर, पोटात एकूण नऊ वार केले. पोलिसांनी त्याला शनिवारी दुपारीच अटक केली. रविवारी न्यायालयात हजर केल्यावर न्यायालयाने त्याला सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. या प्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून पुढील तपास पोलीस निरीक्षक सोंडकर करत आहेत.
>निर्णय कौतुकास्पद
ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयात प्राचीचे शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर तिच्या पालकांनी तिचे डोळे दान करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार, नेत्रदानाची प्रक्रिया करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलास पवार यांनी दिली.