भाईंदरच्या खाजगी शाळेत शिक्षकांना पालकांची धक्काबुक्की
By धीरज परब | Published: October 20, 2022 11:41 PM2022-10-20T23:41:45+5:302022-10-20T23:41:51+5:30
रस्त्यावर थांबवण्या पेक्षा पालकांना पाल्यांसह आत उभे राहू द्या ह्या मुद्द्यावरून भाईंदरच्या पोरवाल शाळेतील शिक्षकांना संतप्त पालकांच्या धक्काबुक्कीला सामोरे जावे लागले.
मीरारोड -
रस्त्यावर थांबवण्या पेक्षा पालकांना पाल्यांसह आत उभे राहू द्या ह्या मुद्द्यावरून भाईंदरच्या पोरवाल शाळेतील शिक्षकांना संतप्त पालकांच्या धक्काबुक्कीला सामोरे जावे लागले. या घटने नंतर पोलिसांनी शाळेला समजपत्र पत्र पाठवले असून दुसरीकडे पालकांवर अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोरवाल शाळेच्या आवारातील संतप्त पालक व शिक्षकांच्या धक्काबुक्कीचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. पालकांच्या सांगण्या नुसार, पोरवाल शाळेचे प्रवेश द्वार हे मुख्य रस्त्यावर असून रस्ता अरुंद आहे. सकाळी ११ च्या सुमारास शाळेच्या बस विद्यार्थ्यांना घेऊन येतात त्यावेळी शाळेत मुलांना सोडण्यासाठी येणाऱ्या पालकांना मुलांना घेऊन रस्त्यावरच थांबावे लागते. त्यावेळी खूप गर्दी होते जेणे करून रस्त्यावरून ये - जा करणाऱ्या वाहनां मुळे अपघाताची भीती असते. त्यामुळे पालकांना मुलांसह बाहेर रस्त्यावर न थांबवता आतील मैदानाच्या कडेला उभे राहू द्या अशी पालकांची मागणी होती.
शाळा प्रशासन दाद देत नसल्याची भावना झालेल्या पालकांनी सोमवार १७ रोजी विचारणा करण्यासाठी शाळेत शिरले . त्यावेळी महिला पालकांना अडवण्याचा प्रयत्न काही महिला शिक्षकांनी केला असता त्यांच्यात बाचाबाची व धक्काबुक्की झाली. भाईंदर पोलिसांना याची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक मुगुट पाटील सह पोलीस पथक शाळेत दाखल झाले व शांतता निर्माण केली.
दरम्यान शाळा शिक्षिकेच्या तक्रारी नंतर काही पालकांवर अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे . तर भाईंदर पोलिसांनी शाळा व्यवस्थापनास खरमरीत पत्र पाठवून शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला महत्व देण्याची भूमिका मांडत पालकांशी सौजन्याने वागावे व चर्चेने त्यांच्या समस्यांवर तोडगा काढावा. जेणे करून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची खबरदारी घेण्याचे कळवले आहे.
शाळा व्यवस्थापनाचे विनोद तिवारी म्हणाले कि, शाळेच्या ठरलेल्या वेळे आधी काही पालक खूप लवकर येतात. त्यामुळे त्यांना बाहेर थांबावे लागते त्यावरून समस्या उद्भवली होती. पण पालक व व्यवस्थापनाने सामंजस्याने त्यावर तोडगा काढला आहे.