एकुलता एक आधार गेल्याने पालक झाले ‘पोरके’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:49 AM2021-06-09T04:49:52+5:302021-06-09T04:49:52+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कल्याण : कोरोनामुळे ज्या मुलांच्या पालकांचा मृत्यू झाला त्यांना दत्तक घेण्यासाठी काही सामाजिक संस्था पुढे आलेल्या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कल्याण : कोरोनामुळे ज्या मुलांच्या पालकांचा मृत्यू झाला त्यांना दत्तक घेण्यासाठी काही सामाजिक संस्था पुढे आलेल्या आहेत. मात्र, ज्या पालकांचा एकुलता एक मुलगा कोरोनाने हिरावून घेतला त्या पालकांचा आधार कोण होणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
राज्य सरकारने ज्या लहान मुलांचे पालक कोरोनाने हिरावून नेले त्यांच्या मदतीसाठी हात पुढे केला. कल्याणचे माजी आमदार जगन्नाथ शिंदे यांनी त्यांच्या शिवनिकेतन संस्थेमार्फत पालक गमाविलेल्या २५ मुलांची शैक्षणिक आणि सांभाळ करण्याची जबाबदारी घेतली. राज्यात पाच विभागांनुसार ज्येष्ठ नागरिकांच्या संस्था कार्यरत आहेत. कोरोनामुळे एकुलता एक मुलगा मृत्युमुखी पडला. त्यामुळे वयोवृद्ध पालक एकटे पडले. आर्थिकदृष्ट्या निराधार झाले, अशा पालकांचा आधार कोण होणार, हीदेखील एक सामाजिक समस्या आहे. या पालकांच्या आधारासाठीही सरकारने पुढे येण्याची गरज आहे. कारण त्यांच्या समस्या अधिक जटील स्वरूपाच्या आहेत. त्या समजून घेऊन त्यावर मार्ग काढण्याची गरज आहे.
---------------
अशा पालकांना अर्थसहाय्याची गरज
ज्या मुलांचे आई किंवा वडील कोरोनामुळे गेले, अशा मुलांची संख्या २९१४ आहे. मात्र, ज्या मुलांचे दोन्ही पालक कोरोनामुळे गेले अशा मुलांची संख्या राज्यभरात ११४ आहे. ज्या पालकांचा एकुलता एक कमावता मुलगा गेल्याने दोन्ही पालक निराधार झाले, अशा पालकांची आकडेवारी उपलब्ध नाही. हा तपशील ज्येष्ठ नागरिक संघांकडेही नाही. त्यांनी अशा प्रकारची माहिती घेऊन सरकारला सादर केली पाहिजे. सरकारनेही अशा पालकांना मदत केली पाहिजे. त्याचबरोबर सामाजिक संस्थांनीही त्यांना दत्तक घेण्यास पुढे आले पाहिजे.
--------------
ज्येष्ठांचे प्रश्न वेगळे
१. ज्येष्ठांचे प्रश्न वेगळे आहेत. ज्या पालकांचा कमावता मुलगा गेल्याने ते आर्थिकदृष्ट्या पूर्णत: निराधार झाले, ते या वयात कामही करू शकत नाहीत. त्यामुळे त्यांच्यापुढे पैशाचा गहन प्रश्न असतो.
२. हाती पैसा नसल्याने त्यांच्या सहव्याधीवरील उपचार कोण करणार. त्यांची म्हातारपणी काळजी कोण घेणार. जर त्यांना वृद्धाश्रमात दाखल केले तर त्याचा खर्च कोण भागविणार, असा प्रश्न ज्येष्ठांसमोर आहे.
------------------
कोरोनाचे एकूण रुग्ण- १,३१,८०६
बरे झालेले-१,३०,११२
सध्या उपचार घेत असलेले- १,६९४
एकूण मृत्यू- २,१३५
------------------