आरटीईच्या प्रवेशासाठी बालकांच्या ऑनलाईन अर्जातील दुरूस्तीची पालकांना संधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2019 07:40 PM2019-06-01T19:40:00+5:302019-06-01T19:44:55+5:30
पहिल्या फेरीतील विविध त्रृटींमुळे बहुतांशी बालकांच्या प्रवेशासाठी समस्या निर्माण झाली. त्यावर मात करण्यासाठी उपाययोजना म्हणून दुसरी सोडत काढण्यापूर्वी पालकांना प्रवेश अर्जातील दुरूस्ती करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या दुरूस्तीमुळे पालकांना प्रवेशाच्या शाळेसह आवश्यक कागदपत्रे,शाळेचा पत्ता आदींची माहिती सहज उपलब्ध होणे शक्य
ठाणे : जिल्ह्यातील ६५२ शाळांमध्ये शिक्षणाचा हक्क (आरटीई) या कायद्याखाली आर्थिकदृष्ट्या दुर्बल व मागासवर्गीय कुटुंबातील बालकांच्या प्रवेशासाठी २५ टक्के जागा आरक्षित ठेवल्या आहेत. यानुसार लॉटरी सोडत काढून पहिल्या फेरीचे प्रवेश झाले. त्यातील अनुभव लक्षात घेऊन दुसरी सोडत काढण्यापूर्वी संबंधीत पालकांना ४ जूनपर्यंत ऑनलाईन प्रवेश अर्जात दुरूस्ती करण्याची संधी दिली आहे.
‘आरटीईतील दुसऱ्या फेरीतील प्रवेशाना विलंब; पालकांमध्ये संताप’ या मथळ्याखाली लोकमतने २७ मे रोजी वृत्तप्रसिध्द करून प्रशासनास जागे केले. याची दखल घेत प्राथमिक शिक्षण संचालनालयाने त्याच दिवशी पत्रक काढून पालकांना अर्जातील दुरूस्तीची संधी दिली आहे. पहिल्या फेरीतील विविध त्रृटींमुळे बहुतांशी बालकांच्या प्रवेशासाठी समस्या निर्माण झाली. त्यावर मात करण्यासाठी उपाययोजना म्हणून दुसरी सोडत काढण्यापूर्वी पालकांना प्रवेश अर्जातील दुरूस्ती करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या दुरूस्तीमुळे पालकांना प्रवेशाच्या शाळेसह आवश्यक कागदपत्रे,शाळेचा पत्ता आदींची माहिती सहज उपलब्ध होणे शक्य आहे.
यास अनुसरून पालकांनी अर्ज भरला परंतु ‘कन्फर्म’ केला नसेल तर कन्फर्म करण्याची दुरूस्ती करण्याचे आवाहन केले आहे. याशिवाय लॉटरी लागलेली नसल्यास पालकांनी त्यांचे गूगल लोकेशन चुकले असल्यास ते दुरूस्त करून घेणे आवश्यक आहे. पहिल्या फेरीत लॉटरी लागली . पण अंतराच्या अडचणीमुळे प्रवेश घेऊ शकले नाही, अशाच तक्रारीची खात्री पडताळणी समितीस करून देणे, पालकांची चूक, तांत्रिक चूक असल्याचे गूगल लोकेशन, व शाळा निवडीत दुरूस्ती करणे. यात घराचे अंतर ३ किमीपेक्षा जास्त असतानाही जाणीवपूर्वक १ किमी.च्या आत दाखवले असल्यास आणि अपात्र ठरवले असल्याचे दुरूस्ती करता येणार नसल्याचे मार्गदर्शनही प्रशासनाकडून देण्यात आले आहे.