पालकांनी विद्यार्थ्यांच्या गुणांची कलचाचणी घ्यावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2017 01:48 AM2017-08-03T01:48:06+5:302017-08-03T01:48:06+5:30
परीक्षेत नुसती टक्केवारी मिळवण्यासाठी धडपडू नका. विद्यार्थी नुसता परीक्षार्थी नको, तर तो सर्वगुणसंपन्न झाला पाहिजे. पण, हे सर्व साध्य करण्यासाठी विद्यार्थ्यांनी चिंतन व मनन केले पाहिजे.
डोंबिवली: परीक्षेत नुसती टक्केवारी मिळवण्यासाठी धडपडू नका. विद्यार्थी नुसता परीक्षार्थी नको, तर तो सर्वगुणसंपन्न झाला पाहिजे. पण, हे सर्व साध्य करण्यासाठी विद्यार्थ्यांनी चिंतन व मनन केले पाहिजे. त्यामुळे नुसत्या परीक्षेत तुम्ही यशस्वी होणार नाही, तर तुमची पुढील भावी वाटचालही यशस्वी होईल. मुख्य म्हणजे पालकांनी विद्यार्थ्यांच्या गुणांची कलचाचणी घ्यावी आणि त्या दिशेने मुलांना पाठवायला पाहिजे, असा सल्ला भाजपा नेते व माजी मंत्री जगन्नाथ पाटील यांनी दिला.
प्रभाग क्र मांक-५९ च्या भाजपा नगरसेविका विद्या म्हात्रे यांनी प्रभागातील दहावीबारावीतील उत्तीर्ण विद्यार्थी आणि देशात सीएच्या परीक्षेत प्रथम आलेल्या राज शेठ याचाही सन्मान करण्यात आला. या वेळी बी.आर. हरणे कॉलेज आॅफ इंजिनीअरिंग अॅण्ड टेक्नॉलॉजी महाविद्यालयाचे संचालक मंगेश हरणे, विश्वास भोईर, भाजपा कल्याण जिल्हा चिटणीस राजेश म्हात्रे, भाजपा महिला मोर्चाच्या ममता तावडे, माजी नगरसेविका रेखा असोदेकर, उद्योजक प्रदीप जोशी, भाजपा पदाधिकारी दिनेश जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.
पाटील म्हणाले, पालक मुलांना महागडे क्लास लावत असतात. आपण कितीही महागडा क्लास लावला, तरी आपला पाल्य शाळेत-कॉलेजमध्ये शांतपणे ऐकतो का? प्रश्न विचारून आपल्या शंकांचे उत्तर मिळवतो का, हे सर्व पालकांनी जाणून घेतले पाहिजे.
सगळे विद्यार्थी चांगलेच असतात. कोणाचीही गुणवत्ता कमी नसते, पण चिंतन-मनन करण्यात कमी पडतो, म्हणून टक्केवारी कमी होते. मुख्य म्हणजे, पालकांनी विद्यार्थ्यांच्या गुणांची कलचाचणी घ्यावी आणि त्या दिशेने मुलांना पाठवायला पाहिजे. आज विविध क्षेत्र प्रत्येकासाठी वाट बघत आहेत. त्यासाठी आपण डोळस व्हायला पाहिजे, असे सांगितले.
या गुणगौरव सोहळ्यात यशस्वी विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, अभ्यासात्मक वस्तूंचा सेट भेट म्हणून देण्यात आला. हा कार्यक्र म यशस्वी करण्यासाठी भोपतराव, सचिन चित्रे, प्रदीप चौधरी, सतीश देशपांडे, सुनील सामंत, सचिन दुर्वे, सुरेश जोशी, नमिता दोंदे, शारदा शिंदे, स्मिता जोशी, सुनीता कुरकुडे यांनी विशेष मेहनत घेतली. प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन नमिता दोंदे यांनी केले.