ठाणे: तुघलकी फी वाढीविरोधात वसंत विहार शाळेबाहेर पालकांचा ठिय्या; मनविसेच्या नेतृत्वाखाली गेटवर गणरायाची महाआरती 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2022 05:42 PM2022-02-04T17:42:42+5:302022-02-04T17:43:23+5:30

माघी गणेश जयंती दिनी अभिनव आंदोलन 

parents sit outside vasant vihar school against fee hike thane maha aarti of ganaraya at the gate under the leadership of mns | ठाणे: तुघलकी फी वाढीविरोधात वसंत विहार शाळेबाहेर पालकांचा ठिय्या; मनविसेच्या नेतृत्वाखाली गेटवर गणरायाची महाआरती 

ठाणे: तुघलकी फी वाढीविरोधात वसंत विहार शाळेबाहेर पालकांचा ठिय्या; मनविसेच्या नेतृत्वाखाली गेटवर गणरायाची महाआरती 

googlenewsNext

ठाणे: कोरोना काळात आधीच रोडावलेल्या आर्थिक स्थितीमुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले असताना ठाण्यातील प्रसिद्ध वसंत विहार शाळेने तब्बल २६ टक्के फी वाढ पालकांच्या माथी मारली होती. या निर्णयाविरोधात आज पालकांनी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या नेतृत्वाखाली शाळेबाहेर आंदोलन केले. यावेळी माघी गणेश जयंतीचे औचित्य साधत शाळेच्या प्रवेशद्वारावर 'महाआरती' करण्यात आली. शाळा प्रशासनाला सुबुद्धी देत फी वाढ मागे घेण्याचे साकडे गणराया चरणी पालकांनी घातले. 

दीड वर्षे लाॅकडाऊनमध्ये शाळा बंद होत्या. या काळात ऑनलाईन वर्ग सुरु होते. मात्र तरीही अनेक खासगी शाळांना पालकांना जाचक पद्धतीने फी वसुलीसाठी तगादा लावला होता. हा प्रकार एकीकडे सुरु असतानाच वसंत विहार शाळेने पहिली ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची २६ टक्के फी वाढ यंदाच्या शैक्षणिक वर्षात केली. कोरोना काळात घर चालवण्यासाठी तारेवरची कसरत सुरु असताना वाढीव फी भरणे पालकांना शक्य नसल्याने त्यांनी याप्रश्नी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे ठाणे जिल्हाध्यक्ष संदीप पाचंगे यांची भेट घेतली. पालकांच्या शिष्टमंडळाची बाजू ऐकून पाचंगे यांनी शाळा प्रशासनाशी पत्रव्यव्हार केला. शेकडो पालकांचा या निर्णयाला विरोध असून याबाबत सहानुभूतीपूर्वक विचार करण्यात यावा, असेही पाचंगे यांनी शाळा प्रशासनाला दिलेल्या निवेदनात स्पष्ट केले. याबाबत ठाणे पालिकेच्या शिक्षणाधिकाऱ्यांशीही पाचंगे यांनी चर्चा करून निवेदन दिले होते. मात्र शाळा प्रशासन तरीही फी वाढीच्या निर्णयावर ठाम असल्याने आज अखेर पालकांनी शाळेने फी भरणा करण्याबाबत असणाऱ्या जाचक अटी मागे घेण्यासाठी आंदोलन केले. मनविसे ठाणे जिल्हाध्यक्ष संदीप पाचंगे यांच्या नेतृत्वाखाली पालकांनी शाळेच्या प्रवेशद्वारासमोर महाआरती करून अभिनव आंदोलन केले. यावेळी पालकांनी शाळेच्या जाचक अटींचा पाढा वाचून ही फी वाढ मागे घेण्याची मागणी केली. 

सकारात्मक निर्णय अपेक्षित 

आंदोलनानंतर पालकांच्या शिष्टमंडळासह मनविसे ठाणे जिल्हाध्यक्ष संदीप पाचंगे यांनी शाळा प्रशासनाची भेट घेतली. यावेळी फी वाढीचा निर्णय येत्या १५ दिवसांत मागे घेतला जाईल. तसेच एकरकमी फी वाढीची अट मागे घेऊन पालकांना टप्प्याटप्प्याने फी भरण्यास मुभा दिली जाईल, असे आश्वासन शाळा प्रशासनाच्या वतीने दिल्याचे पाचंगे यांनी सांगितले. मात्र जोपर्यंत ठोस निर्णय होत नाही. तोपर्यंत याप्रश्नी पाठपुरावा सुरूच राहील, असे पाचंगे म्हणाले.
 

Web Title: parents sit outside vasant vihar school against fee hike thane maha aarti of ganaraya at the gate under the leadership of mns

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.