आई-बाबा मला घरात घ्या, आर्जव करीत पाच तास ताटकळला; बरा झाल्यानंतरही ‘त्याला’ परत आणले मनोरुग्णालयात
By प्रज्ञा म्हात्रे | Published: March 7, 2024 02:41 PM2024-03-07T14:41:49+5:302024-03-07T14:42:32+5:30
नाशिक येथील दिंडोरी गावात राहणाऱ्या स्किझोफ्रेनिया आजाराने ग्रस्त असलेल्या दशरथला त्याच्या वडिलांनी ठाणे येथील प्रादेशिक मनोरुग्णालयात उपचारासाठी ४ फेब्रुवारी २०२२ रोजी दाखल केले होते.
ठाणे : ‘आम्ही उद्या आमच्या मुलाला घ्यायला येणारच होतो, तुम्ही कशाला घेऊन आला ? थांबा बाहेर, मी घर स्वच्छ करतो आणि त्याला आत घेतो, असे म्हणत आई-वडिलांनी दाराला आतून कडी लावून घेतली आणि ४६ वर्षांचा दशरथ (नाव बदलले आहे) पाच तास ताटकळत बाहेर उभा राहिला. घर पाहून त्याचा आनंद गगनात मावेनासा झाला होता; मात्र आई-वडिलांनी त्याच्या तोंडावरच दार लावून घेतल्याने तो ढसाढसा रडू लागला.
नाशिक येथील दिंडोरी गावात राहणाऱ्या स्किझोफ्रेनिया आजाराने ग्रस्त असलेल्या दशरथला त्याच्या वडिलांनी ठाणे येथील प्रादेशिक मनोरुग्णालयात उपचारासाठी ४ फेब्रुवारी २०२२ रोजी दाखल केले होते.
ज्यावेळी उपचाराने दशरथ बरा झाला त्यावेळी त्याला डिस्चार्ज देण्याचा निर्णय मनोरुग्णालयाने घेतला. त्याच्या घरच्यांशी समाजसेवा अधीक्षक सतीश वाघ यांनी संपर्क करण्यास सुरुवात केली. त्यावेळी त्यांनी टाळाटाळ केली. अनेकवेळा संपर्क करूनही मुलास घ्यायला येतो असे उत्तर दिले. शेवटी त्याला घरी नेऊन सोडण्याचे ठरविले. मनोरुग्णालयातून तीन कर्मचारी आणि एक वाहन चालक असे शासकीय वाहनातून त्याच्या घराबाहेर पोहोचले. त्यावेळी दार ठोठावल्यावर वडिलांनी मुलाला पाहताच त्याला घरात घ्यायचे सोडून कर्मचाऱ्यांना उलट प्रश्न करण्यास सुरुवात केली.
आई-वडिलांना घट्ट मिठी मारेन, त्यांच्याशी खूप गप्पागोष्टी होतील, असे दशरथला वाटले हाेते. मात्र आई-वडिलांनी त्याच्या तोंडावरच दार लावून घेतले.
पोलिसांनाही दिली नाही दाद
- दार उघडत नसल्याने संबंधितांनी पोलिसांशी संपर्क साधला. माहिती मिळताच पोलिस तेथे हजर झाले. त्यांनीही दार उघडण्यास सांगितले असता घरातल्यांनी नकारात्मक प्रतिसाद दिला.
- पाच तास प्रयत्न करूनही दार उघडत नसल्याने कर्मचारी, पोलिस आणि दशरथच्या लक्षात आल्याने त्याला मनोरुग्णालयात परत नेण्याचा निर्णय घेतला. घरातलेच स्वीकारत नसल्यामुळे रुग्णालयासमोर त्याला परत आणण्याशिवाय पर्याय नव्हता, अशी माहिती सतीश वाघ यांनी दिली.
कर्मचाऱ्यांचे डोळे पाणावले
पोटच्या लेकरालाच आई-वडिलांनी नाकारले आणि तोंडावरच दार लावून घेतले हे दृश्य पाहणाऱ्या मनोरुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांच्या डोळ्यांतही अश्रू आले. ही घटना ऐकल्यावर वैद्यकीय अधीक्षक, समाजसेवा अधीक्षकही खूप भावुक झाले.
नातेवाईक असूनही अशा रुग्णांना नाईलाजाने पुनर्वसन केंद्रात पाठवावे लागते, याचे दु:ख वाटते. समाजातील माणुसकी कमी झाली की काय असा प्रश्न पडू लागतो.
- डॉ. नेताजी मुळीक, वैद्यकीय अधीक्षक, ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालय