समुद्र किनाऱ्यावर गाडी पार्क करणं भोवलं, वाहून गेलेली कार मच्छीमारांनी अशी बाहेर काढली; पाहा Video
By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2021 10:47 AM2021-10-11T10:47:24+5:302021-10-11T10:50:50+5:30
Car Drowned : ही झायलो गाडी वाहून जात असताना काही मच्छिमार तिला बाहेर काढण्यासाठी धावले. समुद्रात जाऊन त्यांनी गाडी धरून ठेवली आणि नंतर ते दोरखंडाच्या सहाय्याने ती बाहेर ओढण्याचा प्रयत्न करू लागले. पण...
भाईंदर : भाईंदर येथील उत्तन समुद्रकिनाऱ्यावर (Uttan Beach) कार पार्क करणे एका व्यक्तीला चांगलेच भोवले आहे. समुद्राला भरती आहे, येथे कार लावू नका, असे तेथील मच्छीमार आणि रिक्षा चालकांनी सांगूनही त्याने ऐकले नाही आणि आपली झायलो गाडी समुद्र किनारीच पार्क करून तो निघून गेला. यानंतर भरती वाढल्याने ही गाडी समुद्रात वाहून जाऊ लागली. मात्र, तेथील काही मच्छीमारांनी धाव घेत, अथक प्रयत्न करून ती बाहेर काढली. या संपूर्ण प्रकरणाचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
ही झायलो गाडी वाहून जात असताना काही मच्छिमार तिला बाहेर काढण्यासाठी धावले. समुद्रात जाऊन त्यांनी गाडी धरून ठेवली आणि नंतर ते दोरखंडाच्या सहाय्याने ती बाहेर ओढण्याचा प्रयत्न करू लागले. मात्र, गाडीचे स्टेअरिंग लॉक असल्याने गाडी बाहेर काढणे अवघड झाले. अखेर जवळपास चार-साडेचार तासांनंतर त्यांनी जेसीबी बोलावला आणि ती गाडी बाहेर काढली.
समुद्र किनाऱ्यावर गाडी पार्क करणं भोवलं, वाहून गेलेली कार मच्छीमारांनी अशी बाहेर काढली; पाहा Video#XyloCar#bhayanderuttanbeach#uttanbeachpic.twitter.com/bIDMUpDDyU
— Lokmat (@MiLOKMAT) October 11, 2021
यानंतंर, गाडी चालक परतला आणि त्याने गाडी वाहून जाण्यापासून वाचविणाऱ्यांचे आणि अथक प्रयत्न करून बाहेर काढणाऱ्यांचे आभार मानण्याऐवजी हुज्जत घालायला सुरुवात केली. एवढेच नाही, तर त्याने जेसीबीही अडवून ठेवला होता. अखेर जमलेले मच्छीमारांनी आणि रिक्षा चालकांनी त्याची चांगलीच कान उघडणी केल्यानंतर त्याने चूक मान्य केली आणि तो तेथून निघून गेला. हा संपूर्ण प्रकार सुरू असताना घटनास्थळी स्थानिकांनी मोठी गर्दी केली होती.