पार्किंग गैरव्यवहारप्रकरणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2021 04:36 AM2021-03-07T04:36:44+5:302021-03-07T04:36:44+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : पोखरण रोड क्रमांक दोन येथील पार्किंग प्लाझा गैरव्यवहारप्रकरणी संबंधित कंत्राटदारावर फौजदारी गुन्हा दाखल करून ...
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : पोखरण रोड क्रमांक दोन येथील पार्किंग प्लाझा गैरव्यवहारप्रकरणी संबंधित कंत्राटदारावर फौजदारी गुन्हा दाखल करून ठरावाची अंमलबजावणी न करणाऱ्या महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक संजय वाघुले यांनी केली आहे.
आशर रेसिडेन्सी ही इमारत उभारताना विकासकाने सुविधा भूखंडावर उभारलेल्या पार्किंग प्लाझाचे महापालिकेकडे हस्तांतर करण्यात आले. त्यानंतर महापालिकेने ऑगस्ट २०११ मध्ये प्लाझाचे काम मे. ऑटो फॅब कंपनीकडे सहा महिन्यांसाठी सोपविले होते. त्याबदल्यात महापालिकेला दरमहा १४ हजार ५०० रुपये दिले जात होते. या कामासाठी निविदा काढल्यानंतर एका कंपनीने सर्वाधिक ७२ हजार रुपयांची बोली लावली. या संदर्भात १२ ऑगस्ट २०१३ रोजी महासभेत ठरावही मंजूर झाला होता. मात्र, त्याची आठ वर्षानंतरही अंमलबजावणी झालेली नाही. गेल्या वर्षी २२ जुलैपर्यंत हा प्लाझा जुन्या कंत्राटदाराच्या ताब्यात होता. त्यातील एक मजला अजूनही कंत्राटदाराकडून वापरला जात आहे. या काळात पहिल्या पाच वर्षांत ३२ लाख ७७ हजार रुपये व त्यापुढील तीन वर्षातील २० लाख असा ५२ लाखांचा महसूल कंत्राटदाराने बुडविला आहे. या पैशाची महापालिकेकडून वसुली ही केली जात नाही, याकडे वाघुले यांनी महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा व अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे यांचे लक्ष वेधले आहे.