दुचाकी पार्क करताय! पण जरा सांभाळून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2021 04:44 AM2021-09-22T04:44:28+5:302021-09-22T04:44:28+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क डोंबिवली : वाढत्या शहरीकरणात वाहनांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यात पुरेशी वाहनतळे आणि पार्किंगअभावी वाहनांच्या ...

Parking the bike! But be careful | दुचाकी पार्क करताय! पण जरा सांभाळून

दुचाकी पार्क करताय! पण जरा सांभाळून

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

डोंबिवली : वाढत्या शहरीकरणात वाहनांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यात पुरेशी वाहनतळे आणि पार्किंगअभावी वाहनांच्या सुरक्षेचा प्रश्नही तितकाच गंभीर बनला आहे. रस्त्यांवर उघड्यावर उभी केली जात असलेली वाहने चोरीला जाण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्यात दुचाकींना लक्ष्य केले जात आहे. पोलीस तपासात वाहनचोरीच्या गुन्ह्यांचा छडा लागत असला तरी दुचाकी चोरीच्या घटना सर्रास घडत आहेत. त्यामुळे दुचाकी पार्क करताय ! पण जरा सांभाळून, असे म्हणणे वास्तव पाहता अतिशयोक्तीचे ठरणार नाही.

केडीएमसी हद्दीत नऊ ठिकाणी वाहनतळांसाठी जागा आरक्षित आहेत. परंतु, यातील बहुतांश वाहनतळ वापराविना धूळखात पडले आहेत. कल्याण रेल्वेस्थानकाबाहेरील कै. दिलीप कपोते वाहनतळाच्या पुनर्बांधणीचे काम सुरू आहे. तर याच भागातील बोरगावकर वाडीतील वाहनतळ वापराविना पडून आहे. डोंबिवली पूर्वेतील रेल्वेस्थानक नजीकच्या चिमणी गल्लीतील वाहनतळाचादेखील वापर सुरू करण्यात आलेला नाही. त्यामुळे कल्याण-डोंबिवलीतील रेल्वे स्थानक परिसरात येणाऱ्यांना आपल्या दुचाकी रस्त्यावर उघड्यावरच उभ्या कराव्या लागत आहेत.

दुचाकी चोरीचे सत्र लॉकडाऊनप्रमाणे अनलॉकमध्येही सर्रास सुरू आहे. आजही चोरीच्या घटना सुरूच आहेत. कल्याण ॲण्टिरॉबरी, गुन्हे अन्वेषण विभाग तसेच मानपाडा, खडकपाडा, रामनगर यांसह अन्य पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केलेल्या तपासात दुचाकीचे गुन्हे उघडकीस आणून चोरट्यांच्या मुसक्याही आवळल्या आहेत. चोरीच्या दुचाकीही मोठ्या प्रमाणात हस्तगत केल्या आहेत. परंतु, आजही कल्याण-डोंबिवलीत दुचाकी सुरक्षित नाहीत यात शंका नाही.

-----------------------------------------------

या भागात सर्वाधिक धोका

म्हसोबा चौक, ठाकुर्ली : येथे दुचाकी रस्त्यावर उभ्या केल्या जात आहेत. त्यामुळे त्यांची सुरक्षा धोक्यात आली आहे. या ठिकाणांहून दुचाकी चोरीला गेल्याच्या घटना सर्रास घडत आहेत. पोलीस ठाण्यात त्यांची नोंद होते. या परिसरात वाहनतळ नसल्याने रस्त्यावर उघड्यावरच वाहने उभी करावी लागत असल्याचे दुचाकीचालकांचे म्हणणे आहे. वाहनतळ उभारल्यास वाहनेही सुरक्षित राहतील अशी अपेक्षा त्यांची आहे.

------------------------------

स्कायवॉक, कल्याण : पश्चिमेतील रेल्वेस्थानक परिसरातील स्कायवॉकच्या परिसरात मोठ्या प्रमाणात दुचाकी पार्क केल्या जातात. वाहनतळाच्या पुनर्बांधणीचे काम सुरू असल्याने सध्या उघड्यावरच दुचाकी ठेवल्या जात आहेत. या ठिकाणीही चोरीच्या घटना सर्रास घडत आहेत.

------------------

इमारतींमधील पार्किंगही असुरक्षित

घराच्या जवळ तसेच इमारतींच्या आवारात पार्क केलेल्या दुचाकीही सुरक्षित नाहीत. घराजवळून तसेच इमारतीच्या आवारातून दुचाकी चोरी जाण्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात स्थानिक पोलीस ठाण्यांमध्ये दाखल होत आहेत. परिणामी सार्वजनिकप्रमाणे खासगी पार्किंग सुरक्षित नसल्याचे स्पष्ट होत आहे.

---------------------

५० हून अधिक दुचाकींचा छडा

दुचाकी चोरीच्या घटना घडत असल्यातरी तपासात या गुन्ह्यांची उकलही होत आहे. गेल्या वर्षभरात ५० हून अधिक चोरीला गेलेल्या दुचाकींचा शोध लावण्यात आणि चोरट्यांना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. यात अल्पवयीन मुलांसह सराईत गुन्हेगारांचाही सहभाग असल्याचे दिसून आले. परंतु, आरोपी पकडून तसेच गुन्ह्यांचा छडा लागूनही दुचाकी चोरीच्या घटना सर्रास सुरू असल्याने दुचाकीधारकांसाठी वाढत्या घटना डोकेदुखी ठरत आहेत.

---------------------

Web Title: Parking the bike! But be careful

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.