‘पार्किंग प्लाझा’ला १५ मेट्रिक टन ऑक्सिजनचा मिळाला साठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 12:05 AM2021-04-23T00:05:23+5:302021-04-23T00:05:31+5:30
रुग्णांना माेठा दिलासा : आयसीयूसह ऑक्सिजन बेड दोन दिवसांत होणार कार्यान्वित
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : ठाण्यातील पार्किंग प्लाझा कोविड सेंटरकरिता लिंडे कंपनीकडून १५ मेट्रिक टन ऑक्सिजन उपलब्ध झाला असून, येत्या दोन दिवसांत आयसीयु आणि ऑक्सिजन बेड कार्यान्वित करण्यात येणार आहेत.
ठाणे शहराला ऑक्सिजनचा सुरळीत पुरवठा होण्यासाठी महापौर नरेश म्हस्के यांनी स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सतत केलेल्या पाठपुराव्यामुळे ऑक्सिजन पुरवठा सुरू झाला आहे. येथील कोरोनाबाधित रुग्णांना ऑक्सिजनचा पुरवठा कमी प्रमाणात होत असल्याने अतिदक्षता विभागातील रुग्णांची गैरसोय होऊ नये, त्यांना ठाणे कोविड रुग्णालयात स्थलांतरित केले होते. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी ऑक्सिजन पुरवठा करणाऱ्या कंपनीसोबत तत्काळ संपर्क करून महापालिका प्रशासनाला ऑक्सिजन पुरवठा करण्याबाबत सूचना दिल्या होत्या. याबाबत महापौर म्हस्के आणि महापालिका आयुक्त डॅा. विपीन शर्मा यांनीही पाठपुरावा केला होता. त्यानुसार या कंपनीकडून दररोज १५ टन ऑक्सिजन साठा प्राप्त होणार असून, गुरुवारी ऑक्सिजनचा पहिला टँकर दाखल झाला आहे. त्यामुळे येत्या दोन दिवसांत पार्किंग प्लाझामधील आयसीयु आणि ऑक्सिजन बेड टप्प्याटप्प्याने पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्यात येणार आहेत.
कोरोना रुग्णांसाठी जनकल्याण समिती पुरवणार ऑक्सिजन
लोकमत न्यूज नेटवर्क
डोंबिवली : कोरोना रुग्णांसाठी ऑक्सिजनचा तुटवडा असल्याने त्या रुग्णांना रा. स्व. संघ, जनकल्याण समिती कल्याण जिल्ह्याच्या वतीने ऑक्सिजन देण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या आपत्कालीन परिस्थितीत हॉस्पिटलमध्येही बेड्स नाहीत. त्यामुळे समितीमार्फत कल्याण-डोंबिवली भागामध्ये होम आयसोलेशनमध्ये असलेल्या रुग्णांना ऑक्सिजन सिलिंडर पुरवण्याची सुविधा सुरू केली असल्याचे सांगण्यात आले. ज्यांना आवश्यकता आहे, अशा रुग्णांच्या नातेवाइकांनी कोरोना रिपोर्ट, सीटीस्कॅनचा रिपोर्ट, आधारकार्डची एक झेरॉक्स प्रत सोबत घेऊन डाेंबिवली पूर्वेतील शासकीय प्रसूतिगृहासमाेरील घाणेकर बांगला येथे सकाळी ९ ते १, संध्याकाळी ४ ते ८ या वेळेत संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.