पार्किंग प्लाझाला मिळणार ऑक्सिजन; रुग्णांसाठी ३५० बेडची लवकरच साेय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 12:12 AM2021-04-21T00:12:18+5:302021-04-21T00:12:25+5:30
विपीन शर्मा यांची माहिती : कंपनी प्रतिनिधींची आज स्पाॅट व्हिजिट
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : सदस्यांनी ज्या काही समस्या, अडीअडचणी मांडल्या, त्याची नोंद प्रशासनाने घेतली आहे. ऑक्सिजनसाठी अतिरिक्त आयुक्त हे स्वत: संबंधित कंपनीकडे गेले होते. त्यानुसार आज, बुधवारी कंपनीचे प्रतिनिधी स्पॉट व्हिजिट केल्यानंतर तत्काळ ॲग्रीमेंट करून ऑक्सिजन उपलब्ध होईल. त्यानुसार एका तासात पार्किंग प्लाझा येथील ३५० ऑक्सिजन बेड सुरू होऊ शकणार आहेत. मनुष्यबळ वाढविण्यासाठी प्रयत्न केला जाणार असल्याची माहिती ठाणे महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी दिली.
सर्वपक्षीय नगरसेवकांनी महासभेत प्रशासनावर केलेल्या टीकेला उत्तर देताना ते बोलत होते. जिल्हाधिकाऱ्यांनी रेमडेसिविर व ऑक्सिजनचे अधिकार त्यांच्याकडे ठेवले आहेत. महापालिका त्यांच्या यादीत नाही, खासगी रुग्णालयांचा केवळ समावेश आहे, त्यामुळे आपल्याला रेमडेसिविर मिळत नाही. रेमडेसिविरचा दोन दिवसांत साठा उपलब्ध होणार आहे. मुंब्रा कोविड सेंटर सुरू झाले आहे. वॉररूमचा विषय सोडविण्यासाठी मी स्वत: पाहणी करून बैठक घेऊन विषय मार्गी लावणार आहे. मागील काही दिवसांत रुग्ण वाढ होत असली तरी अधिकची होताना दिसत नाही, ही दिलासादायक बाब आहे.
रुग्णांना १२ तासांत बेड उपलब्ध होत आहेत. ग्लोबलमध्ये १५० ऑक्सिजन बेड वाढविले आहेत. तसेच आयसीयुचे २५ बेड वाढविण्याचे काम सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.
ऑक्सिजनसाठी तीन नवीन प्लांट
तयार दोन प्लांट १७५ मेट्रिक टन क्षमतेचे असणार आहे. रोजच्या रोज ३५० सिलिंडर मिळणार आहेत. खासगी रुग्णालयांना मदत देता येणार आहे.
३०० सिलिंडर शिल्लक राहणार असल्याने ३०० ऑक्सिजन बेड वाढविण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहे. त्यानुसार पार्किंग प्लाझा येथे ८०० बेड ऑक्सिजनचे असणार आहेत, तर आणखी एक प्लांन्ट उभारला जाणार आहे. याचा खर्च एमएमआरडीए उचलणार आहे.
या महिन्याचा पगार मिळण्यास उशीर
शासनाचे अनुदान मिळण्यास उशीर झाल्याने या महिन्याचा पगार उशिराने होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. मेडिसीनचा तुटवडा नाही, रेमडेसिविरचा दोन दिवसांत पुरवठा मिळेल, अशी आशा आहे. सध्या ठाण्याला लसीकरणाचा योग्य पुरवठा होत नाही. आता नवीन डोस न आल्याने बुधवारी लसीकरण बंद ठेवण्यात येणार असल्याची माहितीदेखील आयुक्तांनी यावेळी दिली.