ठामपाचे पार्किंग धोरण कागदावरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2019 12:09 AM2019-07-07T00:09:40+5:302019-07-07T00:09:43+5:30

ठेकेदार फिरकलाच नाही । प्रशासनाचे अभय, ठरवलेले स्पॉट तांत्रिक कारणामुळे बदलण्याची वेळ

The parking system of the Thamapacana only on paper | ठामपाचे पार्किंग धोरण कागदावरच

ठामपाचे पार्किंग धोरण कागदावरच

googlenewsNext

ठाणे : गेली कित्येक वर्षे कागदावर असलेले पार्किंग धोरण आतापर्यंत अमलात येणे अपेक्षित होते. यासंदर्भातील पार्किंगचे दर निश्चित करून स्पॉट अंतिम केल्यानंतर मारलेले पिवळे पट्टेही आता पुसले जाऊ लागले आहेत. असे असताना बंगलोरच्या ज्या ठेकेदाराला काम मिळाले आहे, त्याने अद्याप हे काम सुरूच केले नसून महापालिका मात्र या ठेकेदाराची दीड वर्षे उलटूनही वाट पाहत असल्याची बाब समोर आली आहे. दुसरीकडे प्रशासनाने जे काही स्पॉट आधी अंतिम केले होते, त्यातील अनेक स्पॉट आता काही तांत्रिक कारणास्तव बदलण्याची वेळसुद्धा पालिकेवर आली आहे. त्यामुळे एकीकडे ठेकेदार नाही आणि दुसरीकडे स्पॉट बदलण्याची आलेली वेळ यामुळे पालिका मात्र पुरती अडचणीत सापडली आहे.


ठाणे पालिकेने तयार केलेल्या धोरणानुसार शहरातील १७७ रस्त्यांवर पार्किंगची व्यवस्था करण्यात येणार आहे. याठिकाणी तब्बल नऊ हजार ८५५ वाहने पार्क होऊ शकणार आहेत. त्यानुसार, या पार्किंगचे दरही अडीच वर्षांपूर्वीच महासभेत मंजूर झाले आहेत. तसेच पार्किंगचे स्पॉट अंतिम झाल्यानंतर शहरातील बहुतेक ठिकाणी पालिकेने पिवळे पट्टेदेखील मारले होते. आता तेदेखील पुसले आहेत. तसेच रात्रीच्या पार्किंगची संकल्पनादेखील पालिकेने पुढे आणली होती. ती सुरू केव्हा झाली आणि बंद केव्हा झाली, याचादेखील थांगपत्ता ठाणेकरांना लागला नाही. महापालिकेने अ, ब, क आणि ड अशा चार श्रेणींमध्ये रस्ते निश्चित केले आहेत. त्यानुसार, अ वर्गात २९, ब वर्गात ५०, क वर्गात ३० आणि ड वर्गात ५७ रस्त्यांचा समावेश आहे.


ठाण्यात आज वाहनांची संख्या १७ लाखांच्या वर गेली आहे. शहरात पार्किंगची समस्या आ वासून उभी आहे. ही सोय नसल्याने वाहने रस्त्याच्या दुतर्फा लागत आहेत. त्यामुळे वाहतूक पोलिसांकडून या वाहनांवर कारवाई होताना दिसत आहे. परंतु, येथेही दुचाकीच्या बाबतीत नियम आणि चारचाकीच्या बाबतीत वाहतूक पोलिसांचा वेगळा नियम असल्याचे दिसत आहे. रस्त्यात अडगळीत, वाहतूककोंडीला त्रास होत नसलेली दुचाकी उचलली जाते. मात्र, चारचाकी वाहनांवर कारवाई होताना दिसत नाही. त्यामुळे वाहनचालक हैराण झाले आहेत. त्यामुळे पार्किंग धोरणाची वेळेत अंमलबजावणी झाली, तर किमान वाहतूक विभागाच्या या त्रासातून तरी सुटका होईल, अशी अपेक्षा ठाणेकर नागरिक करत आहे.


ठेकेदाराने बँक गॅरंटीही भरली नाही
धोरण तयार केल्यानंतर पार्किंगचे काम ज्या ठेकेदाराला दिले होते, त्याने बँक गॅरंटी तर भरलीच नाही, शिवाय दीड वर्षे उलटूनही नेमका कशासाठी उशीर होत आहे, याचेही उत्तर दिलेले नाही. असे असतानाही दीड वर्षे उलटूनही त्याच ठेकेदाराची वाट महापालिका का बघत आहे, असा सवाल आता यानिमित्ताने उपस्थित झाला आहे. यासंदर्भात पालिकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याशी चर्चा केली असता आम्ही अजूनही त्या ठेकेदाराची वाट पाहत आहोत, असे उत्तर त्याने दिले आहे. वास्तविक पाहता एवढा कालावधी उलटून गेला असल्याने पालिकेने पुन्हा नव्याने निविदा प्रक्रिया पूर्ण करून ठाणेकरांना होत असलेल्या त्रासापासून मुक्त करणे अपेक्षित होते. परंतु, तसेही होताना दिसत नाही.
अनेक स्पॉट बदलावे लागणार
ठाणे महापालिकेने वाहतूक पोलीस किंवा इतर यंत्रणेशी सल्लामसलत करून शहरातील पार्किंगचे स्पॉट अंतिम केले होते. परंतु, असे असतानाही आता नौपाडा, एलबीएस आदींसह इतर भागातील स्पॉट बदलावे लागण्याची वेळ महापालिकेवर आली आहे. काही ठिकाणी वाहतूक पोलिसांनीच आक्षेप घेतला असून एलबीएसवर उड्डाणपूल, मेट्रोचे काम सुरू झाल्याने पालिकेलाही आता नवे स्पॉट शोधावे लागणार आहेत.

Web Title: The parking system of the Thamapacana only on paper

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.