ठाण्यात २५ वर्षे जुन्या इमारतीचा काही भाग कोसळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2021 04:24 AM2021-07-23T04:24:32+5:302021-07-23T04:24:32+5:30
ठाणे : ठाणे शहरातील महागिरी कोळीवाड्यातील साहेजा सोसायटीच्या सी विंगमधील रूम नंबर १०३ चा काही भाग त्या रूमच्या खाली ...
ठाणे : ठाणे शहरातील महागिरी कोळीवाड्यातील साहेजा सोसायटीच्या सी विंगमधील रूम नंबर १०३ चा काही भाग त्या रूमच्या खाली असलेल्या दुकानावर पडल्याची घटना गुरुवारी सकाळी पावणेअकरा वाजण्याच्या सुमारास घडली. यामध्ये कोणालाही दुखापत झाली नसली तरीही त्या रूमच्या खालील किराणा दुकानाचे नुकसान झाल्याची माहिती ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली. ही इमारत २५ वर्षे जुनी आहे. तसेच त्या इमारतीत सध्या १६ कुटुंब वास्तव्यास असून इमारत खाली करून त्यांची राहण्याची पर्यायी व्यवस्था करण्यात येत आहे.
महागिरी कोळीवाडा येथे साहेजा सोसायटी तळ अधिक चार मजली आहे. तसेच या इमारतीच्या तळ मजल्यावर दुकाने आहेत. २५ वर्षे जुनी असलेल्या या इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील फारुख शेख याच्या रूम नंबर १०३ चा बाहेरील भाग खालील किराणा दुकानावर पडला. सातत्याने पाऊस सुरू असल्याने दुकानाबाहेर गर्दी नसल्याने कोणीही जखमी झालेले नाही. पण दुकानाचे नुकसान झाले आहे. तर हा भाग पडल्याने या इमारतीची उर्वरित रचना धोकादायक स्थितीत आली आहे. त्यामुळे ती खाली करण्याबाबत सूचना दिल्या होत्या. त्यानुसार त्यांनी रूम खाली केल्या असून त्यांची महापालिकेमार्फत पर्यायी व्यवस्था करण्यात येत असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. या घटनेची माहिती मिळताच ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन आणि अग्निशमन या विभागांनी घटनास्थळी धाव घेतली.