भिवंडीत धोकादायक इमारतीचे तोडकाम सुरू असताना भाग कोसळला; जीवितहानी टळली!
By नितीन पंडित | Published: June 19, 2024 05:29 PM2024-06-19T17:29:24+5:302024-06-19T17:32:59+5:30
सुदैवाने रस्त्यावर कोणी पादचारी अथवा वाहन नसल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
नितीन पंडित, लोकमत न्यूज नेटवर्क, भिवंडी: धोकादायक इमारतीचे पाडकाम सुरू असताना अचानक इमारत कोसळल्याची दुर्घटना बुधवारी घडली आहे. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
शहरातील प्रभाग समिती क्रमांक चार अंतर्गत सोमानगर परिसरात असलेली नारपोली क्रमांक एक भूभाग मधील मालमत्ता क्रमांक ३६ ही धोकादायक इमारत स्वतः इमारत मालकाने बकरी ईद ची सुट्टी असल्याने शनिवार पासून इमारत तोडण्यास सुरवात केली होती.या बाबत पालिका प्रशासनाला कळविण्यात आले नव्हते. बुधवारी या इमारतीचे तोड काम सुरू असताना अचानक इमारतीचा काही भाग रस्त्याच्या बाजूने कोसळला. सुदैवाने रस्त्यावर कोणी पादचारी अथवा वाहन चालक नसल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
या दुर्घटनेची माहिती मिळाल्यावर पालिका सहाय्यक आयुक्त सुनील भोईर व आपत्कालीन पथकाचे प्रमुख साकिब खर्बे कर्मचारी पथकासह घटनास्थळी दाखल झाले.पालिकेने ही इमारत निर्मनुष्य केली होती पण येथील विद्युत पुरवठा सुरू होता.त्यामुळे ही इमारत पाड काम करताना झालेल्या दुर्घटनेस इमारत मालकास जबाबदार धरीत त्या विरोधात योग्य ती कारवाई करण्यात येईल अशी माहिती सहाय्यक आयुक्त सुनील भोईर यांनी दिली आहे. शहरात पावसाळा आला की धोकादायक इमारतींचा प्रश्न नेहमीच ऐरणीवर येत असतो.
यापूर्वी असंख्य इमारत दुर्घटना या पावसाळ्या च्या सुमाराचे घडलेल्या आहेत.पालिका प्रशासन पावसाळापूर्वी धोकादायक इमारतींची यादी प्रकाशित करून त्या निर्मनुष्य करून ठेकेदार नेमून तोडण्यात येत आहेत.मात्र अशा इमारती शहरात मोठ्या प्रमाणात उभ्या असून भविष्यात मोठी दुर्घटना घडल्यास त्यास जबाबदार कोण असा सवाल उपस्थित होत आहे.