कल्याण डेपोत प्लास्टरचा भाग कोसळला; एक तरुणी जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2019 11:55 PM2019-06-07T23:55:16+5:302019-06-07T23:55:40+5:30

इमारत बनली धोकादायक? स्थापत्य विभाग झोपेत

Part of Kalyan Depot Plaster collapses; A woman injured | कल्याण डेपोत प्लास्टरचा भाग कोसळला; एक तरुणी जखमी

कल्याण डेपोत प्लास्टरचा भाग कोसळला; एक तरुणी जखमी

Next

कल्याण : कल्याण एसटी बसडेपोतील फलाट क्रमांक-२ वरील प्लास्टरचा काही भाग शुक्रवारी जयश्री खंबायत या तरुणीच्या अंगावर पडल्याने ती जखमी झाली. डेपोची इमारत जर्जर झाली असून धोकादायक स्थितीत आहे. या इमारतीचे स्ट्रक्चरल आॅडिट केलेले नाही. तसेच स्थापत्य विभागाकडे पाठपुरावा करूनही देखभाल दुरुस्तीही केली जात नाही. त्यामुळे प्रवासी, बसचालक-वाहक व अन्य कर्मचाऱ्यांचा जीव टांगणीला लागला आहे.

कल्याण रेल्वेस्थानक परिसरासमोरील पाच एकर जागेवर १९७२ पासून एसटीडेपो आहे. डेपोच्या इमारतीची आजवर देखभाल दुरुस्ती न झाल्याने ती जीर्ण झाली आहे. त्याचबरोबर डेपोत अस्वच्छतेचे साम्राज्य आहे. बसफलाटांवर पंखे नाहीत. रात्री डेपोत गर्दुल्ल्यांचा वावर असतो. डेपोच्या आवारात सांडपाणी वाहत आहे. एक प्रसाधनगृह बंद असून ते पाडलेले नाही. वाहकचालकांच्या विश्रांतीगृहातही स्वच्छतेचा अभाव आहे. पाण्याची वानवा आहे. इमारतीची रंगरंगोटी केलेली नाही. बसफलाटांवरील काही फलकांची अक्षरेही दिसत नाहीत.

कल्याण डेपोतून दर १५ मिनिटांनी नाशिक व नगर मार्गांवर बस धावतात. अलिबाग, श्रीवर्धन, पेण, पनवेल, बीड, उस्मानाबाद, औरंगाबाद, पैठण, पुणे, सोलापूर, सातारा, कोल्हापूर, नांदेड, चंद्रपूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आदी भागांसाठीही बस सुटतात. तसेच टिटवाळा ग्रामीण, पडघा, भिवंडी, मुरबाड येथेही बस जातात. त्यामुळे डेपोत प्रवाशांची गर्दी असते. प्लास्टरचा काही भाग कोसळल्याने येथील प्रवाशांची सुरक्षितता धोक्यात आली आहे.

यासंदर्भात डेपो व्यवस्थापक विजय गायकवाड म्हणाले, प्लास्टरचा काही भाग कोसळला. त्यामुळे कोसळण्याच्या बेतात असलेला काही अन्य भागही काढून टाकला आहे. डेपोच्या दुरुस्ती देखभालीबाबत महामंडळाच्या स्थापत्य विभागाकडे पत्रव्यवहार केला आहे. सातत्याने पाठपुरावा सुरू आहे.

‘त्या’ प्रस्तावाचे काय झाले?
कल्याण बसडेपोला दोन वर्षांपूर्वी परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी भेट दिली होती. त्यावेळी राज्यभरातील बसडेपो बीओटी तत्त्वावर विकसित केले जाणार नाहीत. त्याऐवजी राज्यातील ४० बसडेपोंची डिझाइन तयार करण्याचे काम वास्तुविशारद कंपनीला दिले आहे, असे त्यांनी सांगितले होते. मात्र, त्याचे पुढे काय झाले.

कल्याण डेपोचा स्मार्ट सिटीअंतर्गत विकास होणार असेल, तर अन्य ३९ डेपोंच्या इमारती नव्याने बांधण्याचे प्रस्ताव कुठे अडकले आहेत, असा सवाल प्रवासी करत आहेत.

Web Title: Part of Kalyan Depot Plaster collapses; A woman injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :kalyanकल्याण