साकेत पुलावरील जॉइन्टचा भाग निखळला, दुरुस्तीच्या कामाला सुरुवात
By अजित मांडके | Published: August 23, 2023 04:04 PM2023-08-23T16:04:36+5:302023-08-23T16:04:59+5:30
मुंबईकडून नाशिककडे जाणाऱ्या या साकेत पुलाचे काम साधारपणे १९९२ साली करण्यात आले.
ठाणे : मुंबई - नाशिक महामार्गावरील साकेत पुलावरील लोंखडी जोडणीच्या भागामधील भाग निखळल्याची घटना समोर आली आहे. याची माहिती मिळताच मनसेने त्याठिकाणी जाऊन आंदोलन करीत याचे गांर्भीय संबधींत यंत्रणेला लक्षात आणून देण्याचा प्रयत्न केला. तर ज्याठिकाणचा भाग निखळला आहे, त्याठिकाणी बॅरीकेट्स लावण्यात आले आहेत. त्यामुळे वाहतुकीचा नाशिककडे जाणाऱ्या वाहतुकीचा वेग पुर्ता मंदावल्याचे दिसून आले. त्यामुळे वाहनांच्या रांगा थेट तीनहात नाक्यापर्यंत गेल्या होत्या. घटनेचे गांर्भीय लक्षात घेऊन एमएसआरडीसीच्यावतीने याच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले असून पुढील आठ दिवस या कामाला लागणार आहे. त्यामुळे पुन्हा वाहतुक कोंडीचा फटका वाहन चालकांना सहन करावा लागणार आहे.
मुंबईकडून नाशिककडे जाणाऱ्या या साकेत पुलाचे काम साधारपणे १९९२ साली करण्यात आले. त्यानुसार या पुलाला ३२ वर्षांचा कालावधी लोटल्याचे बोलले जात आहे. त्यात हा महत्वाचा मार्ग मानला जात असला तरी देखील दर पावसाळ्यात याठिकाणी खड्डे पडल्याचे चित्र दिसते. यंदा देखील याठिकाणी मास्टिक टाकून येथील रस्ता तयार करण्यात आला आहे. परंतु बुधवारी सकाळी ८ च्या सुमारास मनसेच्या पदाधिकाऱ्याला येथील जोडणीचा भाग निखळल्याचे दिसून आले. त्यानंतर मनसेचे शहर प्रमुख रवि मोरे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी त्याठिकाणी धाव घेतली.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तसेच प्रशासनाला जाग येण्यासाठी त्यांनी याठिकाणी आंदोलन करुन सर्वांच्याच ही बाब लक्षात आणून दिली. त्यानंतर याठिकाणी जो भाग निखळला होता. त्याठिकाणी बॅरीकेट्स टाकण्यात आले आहेत. त्यामुळे वाहतुकीचा वेगही मंदावल्याचे दिसून आले. त्यामुळे वाहनांच्या रांगा थेट तीन हात नाक्यापर्यंत गेल्याचे दिसून आले. दरम्यान, याचवेळी केंद्रीय मंत्री रामदास आठवले नाशिकच्या दिशेने जात होते. मनसेच्या कार्यकर्त्यांनी त्यांचे वाहन अडवून सविस्तर माहिती दिली. त्यानंतर राज्य रस्ते विकास महामंडळाचे अभियंते, वाहतूक पोलीस उपायुक्त डॉ. विनयकुमार राठोड आणि वाहतूक पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पाहणी केली असता, पूलाच्या लोखंडी जोडणीमध्ये मोठी भेग पडल्याचे तसेच बेअरिंगचा भाग निखळल्याचे समोर आले. त्यानंतर तातडीने वाहतूक पोलिसांनी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून येथील धोकादायक भागाभोवती अडथळे बसवून त्या भागातील वाहतूक ऐकेरी पद्धतीने सुरू केली.
आठवले यांच्याकडून नियमांचे उल्लंघन
केंद्रीय मंत्री रामदास आठवले हे त्यांच्या वाहनाने नाशिकच्या दिशेने जात होते. वाहतूक कोंडीमुळे त्यांच्या वाहन चालकाने विरुद्ध दिशेने वाहन चालवून प्रवास केला. केंद्रीय मंत्र्यांकडून नियमांचे उल्लंघन झाल्याने सर्वसामान्यांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. मुंबई नाशिक महामार्गावर दुरुस्तीचे काम संबंधित यंत्रणेकडून हाती घेण्यात आले आहे. परंतु त्यासाठी साधारपणे आठ दिवसांचा कालावधी जाणार आहे. परंतु वाहतुक सुरु ठेवली जाणार आहे. उजवी आणि डावीकडून वाहतुक सुरु ठेवण्यात आली असली तरी नाशिककडे जाणारी वाहतुक एकेरी पद्धतीने सुरु ठेवली जाणार आहे. डॉ. विनयकुमार राठोड, उपायुक्त,
मुंबई नाशिक महामार्गावर दुरुस्तीचे काम संबधींत यंत्रणेकडून हाती घेण्यात आले आहे. परंतु त्यासाठी साधारपणे आठ दिवसांचा कालावधी जाणार आहे. परंतु वाहतुक सुरु ठेवली जाणार आहे. उजवी आणि डावीकडून वाहतुक सुरु ठेवण्यात आली असली तरी नाशिककडे जाणारी वाहतुक एकेरी पध्दतीने सुरु ठेवली जाणार आहे.
- डॉ. विनयकुमार राठोड, उपायुक्त, ठाणे वाहतूक शाखा
या पुलाखालील बाजूस बेअरींगची समस्या असण्याची शक्यता आहे. परंतु घटनेची माहिती मिळताच त्याठिकाणचा सर्व्हे करण्यात आला असून दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे.
(सुभाष बोरसे - कार्यकारी अभियंता, एमसआरडीसी)
साकेत पूलाची स्थिती भयंकर आहे. हा पूल कोसळल्यास अनेक अपघात होऊ शकतात. त्यामुळे पूलाची दुरुस्ती करणे आवश्यक आहे. - रामदास आठवले, केंद्रीय मंत्री