डोंबिवलीत इमारतीच्या ओपन टेरेसचा काही भाग कोसळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2021 04:45 AM2021-09-21T04:45:39+5:302021-09-21T04:45:39+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क डोंबिवली : पश्चिमेतील म्हात्रेवाडी भागातील २९ वर्षे जुन्या त्रिभुवन ज्योत या चार मजली इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील ...
लोकमत न्यूज नेटवर्क
डोंबिवली : पश्चिमेतील म्हात्रेवाडी भागातील २९ वर्षे जुन्या त्रिभुवन ज्योत या चार मजली इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील ओपन टेरेसचा काही भाग (कॅन्टीलीव्हर) हा खालच्या मजल्यावरील बाल्कनीवर कोसळल्याची घटना सोमवारी घडली. त्या घटनेत कोणतीही जीवितहानी हानी झालेली नाही. मनपा प्रशासनाने याची तात्काळ दखल घेत इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे निर्देश दिले आहेत.
ओपन टेरेसचा काही भाग अचानक सोमवारी सकाळी ९.३० च्या सुमारास कोसळला. त्यावेळी त्या घरात गरोदर मातेसह अन्य सदस्यही होते. परंतु, संपूर्ण कुटुंबीय सुरक्षित आहे. या घटनेची नोंद घेत माजी नगरसेवक जनार्दन म्हात्रे यांनी तातडीने इमारतीमधील नागरिकांची भेट घेत त्यांची विचारपूस केली.
त्रिभुवन ज्योत सोसायटीने पाच वर्षांपूर्वी या इमारतीची डागडुजी करून घेतली आहे. परंतु, या घटनेमुळे या इमारतीच्या रहिवाशांना मनपाच्या पॅनलवरील स्ट्रक्चरल ऑडिटरकडून ऑडिट करून घेण्याची नोटीस दिली आहे. तसेच जेथे स्लॅब पडला आहे, त्या भागाच्या खाली राहणाऱ्या रहिवाशांना सुरक्षितस्थळी स्थलांतरित होण्याची सूचना दिली आहे. स्ट्रक्चरल ऑडिटचा अहवाल आल्यावर त्यानुसार आवश्यक निर्णय घेऊन इमारत दुरुस्ती, पुनर्बांधणी करण्याबाबत ठरवायचे आहे. त्याबाबतच्या सूचनाही सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत, असे केडीएमसीच्या ‘ह’ प्रभागाचे सहायक आयुक्त सुहास गुप्ते यांनी दिल्या आहेत.
----------------