ग्रीन रेसमध्ये सहभागी असलेल्यांनी वृक्ष लागवड करण्यासाठी पुढे यावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2021 04:43 AM2021-09-26T04:43:24+5:302021-09-26T04:43:24+5:30
कल्याण : ग्रीन रेसमध्ये सहभागी असलेल्या सर्वांनी वृक्षलागवड करावी. आपले शहर हिरवेगार करावे, असे आवाहन कल्याण-डोंबिवली महापालिकेचे आयुक्त डॉ. ...
कल्याण : ग्रीन रेसमध्ये सहभागी असलेल्या सर्वांनी वृक्षलागवड करावी. आपले शहर हिरवेगार करावे, असे आवाहन कल्याण-डोंबिवली महापालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी केले आहे. महापालिका आणि न्याय ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने २६ ऑगस्ट ते ५ सप्टेंबर २०२१ या कालावधीत ग्रीन रेस आयोजित केली होती. या ग्रीन रेसच्या पारितोषिक वितरण समारंभ सावित्रीबाई फुले नाट्यगृहात पार पडला.
याप्रसंगी आयुक्तांनी उपरोक्त आवाहन केले. यावेळी आयुक्तांनी सांगितले की, महापालिकेच्या आरक्षित भूखंडावर महापालिकेने अनेक झाडे सामाजिक संस्थांच्या मदतीने लावली आहे. आरक्षित भूखंडावर वृक्षारोपण करण्यासाठी सामाजिक संस्थांनी पुढाकार घेतल्यास महापालिका संस्थांना मदत करणार आहे. ग्रीन रेस हा एक चांगला उपक्रम आहे. या माध्यमातून अनेकांना निसर्गाच्या जवळ जाण्याची संधी मिळाली. यामध्ये २०० झाडांच्या विविध प्रजातींचे संकलन करण्यात आले. त्याचे एक पुस्तक तयार केल्यास विद्यार्थ्यांना एक खजिनाच उपलब्ध होईल.
ग्रीन रेसमध्ये विविध वयोगटांतील विविध व्यावसायातील ३५ पथकांनी सहभाग घेतला. अनेक पालक त्यात सहभागी झाले होते. आयुक्तांसह शहर अभियंत्या सपना कोळी-देवनपल्ली, मुख्य उद्यान अधीक्षक संजय जाधव, जनसंपर्क अधिकारी माधवी पोफळे यांच्याहस्ते ग्रीन रेसमधील विजेत्यांना स्मृतिचिन्ह व प्रशस्तिपत्रक देऊन गौरविण्यात आले. डोंबिवलीतील बोटॅनिकल पार्क तयार करण्यासाठी वनअधिकारी वैभव वाळिंबे यांचे सहकार्य आहे. त्यांचा आयुक्तांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक न्याय ट्रस्टचे विश्वास भावे यांनी केले; तर सूत्रसंचालन महापालिकेचे अधिकारी दत्तात्रय लधवा यांनी केले.