एकलव्य मुलांचा अभिवाचन कार्यशाळेत सहभाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 05:00 AM2021-02-23T05:00:15+5:302021-02-23T05:00:15+5:30
ठाणे : अभिवाचन कार्यशाळेत प्रचंड उत्साहात सहभागी झालेल्या एकलव्य मुलांना सुप्रसिद्ध अभिनेते, गांधी अंतिम पर्व या रत्नाकर मतकरीलिखित नाटकाचे ...
ठाणे : अभिवाचन कार्यशाळेत प्रचंड उत्साहात सहभागी झालेल्या एकलव्य मुलांना सुप्रसिद्ध अभिनेते, गांधी अंतिम पर्व या रत्नाकर मतकरीलिखित नाटकाचे अभिवाचक आणि अभिनेते योगेश खांडेकर, अनेक व्यावसायिक नाटकात महत्त्वाच्या भूमिका निभावणारे अभिनेते सुयश पुरोहित यांनी मार्गदर्शन केले. स्वतः अभिवाचन करून मुलांना आवाजातून भावना प्रकट करण्याचे प्रशिक्षण देऊन त्यांच्याकडूनही प्रभावी अभिवाचन करून घेऊन या दोन संवेदनशील कलाकारांनी मुलांना अडीच तास गुंगवून ठेवले.
अतिशय उल्हासात आणि खेळीमेळीत; पण कोरोनासंदर्भात सर्व काळजी घेऊन पार पाडलेल्या या कार्यशाळेत ठाण्यातील मानपाडा, माजिवडा, कळवा, धर्मवीरनगर, सावरकरनगर अशा विविध लोकवस्तीतील सुमारे ५० मुली-मुलांनी सहभाग घेतला. याआधी साने गुरुजींच्या सोन्या मारुती या ग्रंथाच्या संपादित अंशाचे प्रभावी अभिवाचन सादर करणाऱ्या संस्थेच्या चमूतील मीनल उत्तुरकर यांनी त्यावेळच्या आठवणी जागवून आजच्या कार्यशाळेतून उमगलेले अभिवाचनाचे बारकावे आणि श्वासोच्छावासापासून माईक कसा धरायचा इथपर्यंत मिळालेल्या टिप्स बहुमोल असल्याचे सांगितले. संस्थेच्या अध्यक्ष मनीषा जोशी, व्यवसायाने कॉर्पोरेट प्रशिक्षक असलेल्या उल्का शुक्ल यावेळी व्यासपीठावर उपस्थित होत्या. त्यांनी वंचितांचा रंगमंचावरील एकलव्य मुलांसाठी व्यक्तिमत्त्व विकासाच्या कार्यशाळा घेण्याची इच्छा व्यक्त केली. संस्थेचे विश्वस्त ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते संजय मंगला गोपाळ यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले. संस्थेचे खजिनदार सुनील दिवेकर यांनी या कार्यक्रमाची व्यवस्था उत्तम सांभाळली. यावेळी संस्थेचे विश्वस्त ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते जगदीश खैरालिया, विश्वनाथ चांदोरकर व मान्यवर उपस्थित होते.