प्रचारासाठी पक्षांची सोशल मीडियाला पसंती

By admin | Published: January 15, 2017 05:17 AM2017-01-15T05:17:01+5:302017-01-15T05:17:01+5:30

यंदाच्या महापालिका निवडणुकीत मतदारांना आकर्षित करण्यासाठी सोशल मीडियाचा आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर पक्षांकडून केला जाणार आहे. त्यामुळे लवकरच तुमच्या

Parties want social media to campaign | प्रचारासाठी पक्षांची सोशल मीडियाला पसंती

प्रचारासाठी पक्षांची सोशल मीडियाला पसंती

Next

- प्रज्ञा म्हात्रे,  ठाणे
यंदाच्या महापालिका निवडणुकीत मतदारांना आकर्षित करण्यासाठी सोशल मीडियाचा आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर पक्षांकडून केला जाणार आहे. त्यामुळे लवकरच तुमच्या मोबाइल, लॅपटॉपवरही निवडणुकीतील आरोप-प्रत्यारोप, यांचे पडघम वाजू लागतील.
यंदा शिवसेना, भाजपा, मनसे, राष्ट्रवादी हे पक्ष प्रचारासाठी सोशल मीडियाचा आधार घेणार आहेत. या पक्षांनी फेसबुक, टिष्ट्वटर, व्हॉट्सअ‍ॅप यांचा वापर केला आहे. प्रत्येक प्रभागातील तरुणांना सोशल मीडियाद्वारे प्रचार करण्याकरिता तयार केले आहे. प्रत्येक प्रभागातील ६० तरुण यासाठी निवडले आहेत. ही मुले १२ तास सोशल मीडियावर अ‍ॅक्टिव्ह राहणार आहेत. या सोशल साइट्सद्वारे थेट लोकांशी आम्ही कनेक्ट राहणार आहोत. तसेच, पक्षाचे अधिकृत पेज तयार केले असून त्यावर येणारे संदेश सोशल साइट्सद्वारे पोहोचवले जाणार आहे. मतदारांचे ग्रुप तयार करण्याच्या सूचनाही या तरुणांना दिल्या आहेत, असे मनसेचे ठाणे शहराध्यक्ष अविनाश जाधव यांनी सांगितले. यासंदर्भात मनसेतर्फे २५ जानेवारीला गडकरी रंगायतन येथे सोशल मीडिया सेलचा मेळावा होत आहे. यात कसा प्रचार करावा, समोरच्या व्यक्तीच्या प्रश्नाला कसे आणि काय उत्तर द्यावे, याचे मार्गदर्शन केले जाईल, असे जाधव यांनी सांगितले. आम्ही प्रचारासाठी डिजिटल मीडियाचाही वापर करणार आहोत. सोशल मीडियामध्ये फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप, टिष्ट्वटरवर भर असेल. इच्छुक उमेदवारांनी त्यांचे पेजेसही तयार केले आहे, असे शिवसेनेचे ठाणे जिल्हाप्रमुख नरेश म्हस्के यांनी सांगितले. सोशल मीडियाच्या माध्यमातून उमेदवाराचा प्रचार केला जाणार आहे. उमेदवार जाहीर झाले की, त्यांचे पेज तयार केले जाणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांनी सांगितले. कार्यकर्त्यांचे व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप तयार केले आहे. त्यानंतर, उमेदवार मतदारांचे व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप तयार करणार आहोत, असेही त्यांनी सांगितले.

भाजपाचे जे सदस्य झालेत, त्यांचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप तयार केला आहे. परंतु, सोशल मीडियाबरोबर आम्ही वैयक्तिक संपर्कावर भर देणार आहोत. मतदारांच्या गाठीभेटी हा महत्त्वाचा भाग राहील, असे भाजपाचे शहराध्यक्ष संदीप लेले यांनी सांगितले.

Web Title: Parties want social media to campaign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.