अपक्षांच्या प्रचाराने पक्ष धास्तावले
By admin | Published: October 28, 2015 12:51 AM2015-10-28T00:51:21+5:302015-10-28T00:51:21+5:30
कल्याण (पूर्व) मध्ये मातब्बर राजकीय पक्षांच्या बरोबर अपक्षांनीही प्रचारात आघाडी घेतली असल्यामुळे राजकीय पक्षांचे उमेदवार धास्तावले आहेत.
दिवाकर गोळपकर, कोळसेवाडी
कल्याण (पूर्व) मध्ये मातब्बर राजकीय पक्षांच्या बरोबर अपक्षांनीही प्रचारात आघाडी घेतली असल्यामुळे राजकीय पक्षांचे उमेदवार धास्तावले आहेत.
कल्याण (पूर्व) मध्ये राजकीय पक्षांतून अनेक प्रभागांमध्ये तिकीट न मिळाल्यामुळे बंडाळी झाली आहे, ते सर्व अपक्ष म्हणून निवडणूक लढवीत असून सर्व शक्तीनीशी मैदानात उतरले आहेत. प्रत्येक प्रभागामध्ये १० ते १५ अपक्ष उमेदवार तेथील मातब्बर राजकीय पक्षाच्या उमेदवारांना आव्हान देण्यासाठी उभे आहेत. त्यांना हेही माहिती आहे की, धनाढ्य उमेदवारांच्या स्पर्धेत आपण टिकू शकत नाही. परंतु २०० ते ५०० मते आपण खाऊ शकतो आणि अशा प्रकारे सर्वच अपक्षांनी मते मिळवली तर विजयाचे गणित बदलू शकते, हेच त्यांना हवे आहे. तर काही अपक्ष आपल्या विजयाची तोरणे बांधण्याच्या तयारीत आहेत. याचे कारण मातब्बर राजकीय पक्षांमध्येसुद्धा सुंदोपसुंदी सुरु आहे.
अनेक प्रभागांची भ्रमंती केली असता मातब्बर राजकीय पक्षांनी आपल्या प्रचारफेरीतून संपूर्ण प्रभागात हवा निर्माण केली आहे. परंतु मतदार सुज्ञ आहे, तो गेल्या वेळच्या लोकप्रतिनिधीने काय कामगिरी केली आहे, हे तो जाणून आहे आणि अनेकांशी चर्चा केली असता त्यांनी मतदान कोणाला करायचे हे ठरवले आहे. काहींनी असे म्हटले की या निवडणुकीने शेकडो युवकांचा, महिलांचा रोजगार मिळवून दिला आहे. काहीच्या प्रचारफेरीमध्ये गर्भवती कमरेवर लहान मुले व चालताना ज्यांना कष्ट होत होते, अशा वयोवृद्ध महिला सहभागी होत्या, हे दृष्य लाजीरवाणे होते. अनेक प्रभागातील प्रचारफेरीमध्ये दुसऱ्या प्रभागातील महिलांना नाईलाजाने सहभागी करून घेण्यात आल्याचे पक्षीय कार्यकर्त्यांनीच सांगितले.
कल्याण-डोंबिवली महापालिकेची सत्ता शिवसेनेकडून खेचून घ्यायचीच, असा चंग भाजपाने केल्यामुळे शिवसेनाही पेटून उठली असल्याचे दृष्य दिसत आहे. नुकत्याच झालेल्या राज ठाकरेंच्या सभेमुळे मनसेच्या उमेदवारांमध्ये चैतन्य निर्माण झाले आहे. त्यामुळे काही ठिकाणी दुरंगी, तर काही ठिकाणी तिरंगी लढत होणार आहे.
आचार संहितेची बंधने असूनही अतिशय चालाखीने सर्वांचा निवडणूक प्रचार सुरु आहे. प्रत्यक्ष निवडणुकीच्या आदल्या रात्री आणि निवडणुकीच्या दिवशी ज्यांना विजयाची खात्री वाटते ते सर्व उमेदवार मतांच्या बेगमीसाठी सर्वतोपरी मार्ग अवलंबणार असून हसतखेळत एकमेकांना सहकार्य केले जाणार आहे.
प्रसंगी खटके उडाले तरी खेळीमेळीने वाद मिटविले जाणार आहेत. फारच कमी ठिकाणी संघर्ष होणार आहे. लोकशाहीच्या नावाखाली उघड्या डोळ्यांनी तमाशा बघावा लागणार आहे. कमकुवत उमेदवार हे ची फल काय मम तपाला असे म्हणत डोळे मिटून घेणार आहे.