महिला आरक्षणामुळे पक्ष कामाला
By Admin | Published: August 3, 2015 03:44 AM2015-08-03T03:44:04+5:302015-08-03T03:44:04+5:30
कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीच्या आरक्षणाची सोडत शुक्रवारी निघाली. त्यामध्ये ६१ वॉर्डात महिला आरक्षण झाल्याने सर्वच राजकीय पक्ष
अनिकेत घमंडी, डोंबिवली
कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीच्या आरक्षणाची सोडत शुक्रवारी निघाली. त्यामध्ये ६१ वॉर्डात महिला आरक्षण झाल्याने सर्वच राजकीय पक्ष एवढ्या उमेदवार शोधण्याच्या कामाला लागले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने जरी या आरक्षणासंदर्भात न्यायालयात धाव घ्यायचे ठरवले असले तरीही त्यातून फारसे काही निष्पन्न होणार नसल्याचे स्पष्ट होत आहे. महिला उमेदवार मिळविण्यासाठी शिवसेना-भाजपा वगळता अन्य पक्षांची दमछाक होणार असल्याचे चित्र आहे. काँग्रेससह राष्ट्रवादी काँग्रेसला त्यांचे सध्याचेच विद्यमान नगरसेवक पक्षामध्ये टिकविताना नाकीनऊ येणार असल्याचे स्पष्ट आहे. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसमधील राजीनामा नाट्याकडे वरिष्ठांनी कानाडोळा केल्याने नेमके काय होणार, यावरून त्या पक्षात अस्वस्थता आहे.
या सोडतीमुळे वगळलेल्या २७ गावांचा समावेश झाल्याने सद्य:स्थितीला केडीएमसी क्षेत्रातील १५ लाख १७ हजार ८६२ लोकसंख्या पाहता प्रत्येक प्रभागासाठी किमान १२ हजार ६४९ संख्या गृहीत धरण्यात आली आहे. त्यामुळे यंदा प्रभागांची संख्या १०७ वरून १२२ वर पोहोचली आहे. त्यात अनुसूचित जातीच्या ६, अनुसूचित जमातीच्या २, मागास प्रवर्गातील १७, सर्वसाधारण गटातील ३६ सदस्यांचा समावेश असणार आहे. आरक्षित प्रवर्गात निवडून येणाऱ्या उमेदवाराने निवडून आलेल्या तारखेपासून सहा महिन्यांच्या आत जातवैधता प्रमाणपत्र सादर करायचे आहे.