लवकरच पक्ष प्रवेश करणार; सुरेश म्हात्रे यांचं विधान, मुहूर्त अन् पक्षाबद्दल मात्र मौन कायम
By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2021 05:13 PM2021-10-13T17:13:04+5:302021-10-13T17:23:13+5:30
सुरेश म्हत्रे हे ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण राजकारणात महत्वाचे नाव असून केंद्रीय पंचायत राज मंत्री कपिल पाटील यांचे कट्टर राजकिय विरोधक आहेत.
- नितिन पंडीत
भिवंडी- शिवसेनेचे माजी जिल्हा संपर्क प्रमुख तसेच जिल्हा परिषदेच्या आरोग्य व बांधकाम समितीचे माजी सभापती सुरेश म्हात्रे उर्फ बाळया मामा यांनी मे महिन्यात शिवसेनेचा राजीनामा दिला आहे. सुरेश म्हात्रे यांच्या सेना राजीनाम्यानंतर ते कोणत्या पक्षात प्रवेश करणार याबाबत राजकीय चर्चांना उधाण आले होते दरम्यान आपण लवकर राजकारणात सक्रिय होणार असून लवकरच पक्ष प्रवेश करणार असल्याची प्रतिक्रिया सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांनी लोकमतला दिली आहे . मात्र ते कोणत्या पक्षात प्रवेश करणार व पक्षप्रवेशाचा नेमकी मुहूर्त कधी याबाबत त्यांनी मौन कायम ठेवले आहे .
सुरेश म्हत्रे हे ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण राजकारणात महत्वाचे नाव असून केंद्रीय पंचायत राज मंत्री कपिल पाटील यांचे कट्टर राजकिय विरोधक आहेत. मधल्या काळात कपिल पाटील यांची केंद्रीय मंत्री पदी वर्णी लागल्यानंतर आगामी लोकसभा निवडणुकीत कपिल पाटील यांना राजकीय शह देण्यासाठी सुरेश म्हात्रे यांना राजकीय पाठबळ देणे हि ते ज्या पक्षात प्रवेश करणार त्या पक्षाची देखील गरज होणार आहे. कारण मंत्री कपिल पाटील यांच्या विरोधात राजकीय भूमिका घेणारा एकही चेहरा सध्या ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण राजकारणात नाही. त्यातच मंत्री कपिल पाटील यांचा लोकसभा मतदार संघ हा भिवंडी असल्याने या मुस्लिम बहुल मतदार संघात पाटील यांच्या विरोधात काँग्रेस व राष्ट्रवादी बरोबरच ईतर पक्षांकडे देखील आजच्या घडीला चेहरा नाही. त्यामुळे बाळ्या मामा हे काँग्रेस मध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा आजही मतदार संघात रंगत आहेत. मात्र मे महिन्यात सेनेला जय महाराष्ट्र केल्या नंतर तब्बल पाच महिने सुरेश म्हात्रे यांनी आपली राजकीय भूमिका स्पष्ट केली नव्हती मात्र आता आपण लवकरच राजकीय क्षेत्रात मोठ्या ताकदीनिशी उतरणार वसूल लवकरच राजकीय पक्ष प्रवेश करणार आहोत असे मत सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांनी दै लोकमतशी बोलतांना स्पष्ट केले आहे .
बाळ्या मामा यांनी २०१९ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या विरोधात जाहीर बंड पुकारले होते. त्यामुळे सेना भाजप युतीच्या विरोधात काम केल्यामुळे सेना पक्षश्रेष्ठींनी बाळ्या मामा यांच्यावर पक्षांतर्गत कारवाई केली होती. त्यावेळी कारवाई झाली तरी बेहत्तर मात्र कपिल पाटील यांना निवडणुकीत मदत करणार नाही अशी भूमिका सुरेश म्हात्रे यांनी घेतली होती. सध्या कपिल पाटील केंद्रीय मंत्री झाल्याने त्यांची राजकीय ताकद वाढली आहे तर दुसरीकडे आगामी लोकसभा निवडणुकीत कपिल पाटील यांच्या विरोधात कोणत्याही राजकीय पक्षाकडे चेहरा नसल्याने सुरेश म्हात्रे नेमकी कोणत्या पक्षात प्रवेश करणार याची उत्सुकता भिवंडी लोकसभा मतदार संघात आजही आहे.
लोकसभा निवडणुकीचा विचार करता सुरेश म्हात्रे काँग्रेस मध्ये प्रवेश करण्याचे संकेत आहेत, मात्र ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात सेना , भाजप नंतर राष्ट्रवादीची देखील ताकद बऱ्यापैकी असल्याने ते राष्ट्रवादीच्या गोटात सामील होणार का ? हे हि पाहणे गरजेचे आहे. तर तब्बल पाच महिन्यानंतर सुरेश म्हात्रे पक्ष प्रवेश करणार असल्याने त्यांच्या पक्ष प्रवेशाबाबत त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान पक्षप्रवेशाबाबत मला अनेक पक्षांचे निरोप आले आहेत, लवकरच मी राजकारणात सक्रिय होणार असून येत्या काही दिवसांमध्येच अधिकृत रित्या पक्ष प्रवेश घेणार आहे. अशी प्रतिक्रिया सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांनी दै लोकमतला दिली आहे.