परप्रांतीय शिक्षण संस्थेने ठाण्यात मांडलाय शिक्षणाचा बाजार, अवघी 100 रुपये फी, फक्त 15 ते 20 विद्यार्थी, सुविधांचा अभाव, मनसेचा आरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2018 01:44 PM2018-12-11T13:44:55+5:302018-12-11T13:47:21+5:30
परप्रांतीय शिक्षण संस्थेने ठाण्यात मांडलाय शिक्षणाचा बाजार मांडल्याचा आरोप मनसेने केला आहे.
ठाणे : घोडबंदर रोड आनंद नगर येथील एस.जी. इंग्लिश स्कूलचे प्रकरण मनसेने उघडकीस आणल्यानंतर त्याच संस्थेने अजून एका ठिकाणी सुरु केलेल्या शाळेचा भांडाफोड मनसेने केला आहे. शालेय फी अवघी 100 रुपये, 15 ते 20 विद्यार्थ्यांची पटसंख्या, शाळा की कोंडवाडा अशी परिस्थिती असलेल्या मानपाडा येथील कृष्णा नगर येथे ही शाळा सुरु आहे. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे ठाणे उपशहर अध्यक्ष प्रमोद पत्ताडे यांनी ठाणे मनपा शिक्षणाधिकाऱयांकडे याबाबत लेखी तक्रार केली असून सखोल चौकशीची मागणी केली आहे.
शिक्षणाधिकाऱयांना निवेदन देताना प्रमोद पत्ताडे यांच्यासमवेत मनविसेचे शहर अध्यक्ष किरण पाटील, ठाणे शहर सचिव सचिन सरोदे व अरविंद बाचकर, उपशहर अध्यक्ष दीपक जाधव व विजय रोकडे, विभाग अध्यक्ष विजय दिघे, उपविभाग अध्यक्ष हेमंत मोरे, प्रभाग अध्यक्ष प्र.क्र. 4 लहू दळवी, शाखा अध्यक्ष क्र. 4 संदीप गोंदुकुपे, विभाग अध्यक्ष ऋषिकेश चौधरी, उपविभाग अध्यक्ष हर्षद काहंडोळे, विभाग अध्यक्ष गौरव भोईर, शाखाध्यक्ष अक्षय चौधरी आदींचा समावेश होता. ठाणे शहरात दिवसेंदिवस लोकसंख्या वाढत आहे. याचाच फायदा घेऊन काही परप्रांतीय शिक्षण संस्था शिक्षणाचा बाजार चालवत आहेत, अशी बाब नजरेस येत असून सर्व काही सेटींगवरती चालत असून `तुम्ही खा, आम्हाला पण खाऊ द्या' असे या शाळांची परिस्थिती पाहून म्हणावेसे वाटते असे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. टिकुजिनी वाडी येथील उच्चभ्रू वस्तीमध्ये कृष्णानगर येथे सदर शाळा सुरू असून या शाळेमध्ये पदवी नसलेले शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवत आहेत. शाळेची अवस्था अतिशय भयावह आहे. अस्वच्छ वर्ग, शौचालय आढळून आले नाही, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वाढीसाठी पोषक असे वातावरण नाही आणि अत्याधुनिक सोयीसुविधाही नाहीत. या शाळेत फक्त 15 ते 20 विद्यार्थी शिक्षण घेत असून शाळेची प्रवेश फी फक्त 100 रुपये महिना आणि वार्षिक फी फक्त 150 रुपये आहे. तेथील गरजू विद्यार्थी या शाळेत शिक्षण घेत आहेत. ही शाळा तीन वर्षांपासून येथे या अवस्थेत सुरू असून या अगोदर अनधिकृत बांधकाम म्हणून ठाणे महापालिकेने या शाळेवर कारवाई केली होती. तरी सुद्धा गेल्या तीन वर्षांपासून या अवस्थेत ही शाळा सुरू असल्याची माहिती निवेदनात देण्यात आली आहे. जर या शाळा अशाप्रकारे चालत असतील तर विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आहे. अशा शाळा स्थानिक प्रशासनाकडून दुर्लक्षित होतात तरी कशा? यांना मान्यता मिळते तरी कशी? असे सवाल या निवेदनात उपस्थित करून या संस्थेच्या जेवढ्या शाळा आहेत तेथील सर्व शिक्षकांची बिंदु नामावली मार्पत (रोस्टर) चौकशी व्हावी, अशाप्रकारच्या निकृष्ट दर्जाचे शिक्षण देणाऱया सदर संस्थेची मान्यता रद्द करण्यात यावी तसेच या शाळांना मान्यता कशी दिले जाते याची सखोल चौकशी करण्यात यावी व विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱया अशा संस्थांची दखल घेऊन त्यांच्यावर गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल करावेत अशी मागणी निवेदनात करून योग्य ती कारवाई लवकरात लवकर झाली नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे ठाणे उपशहर अध्यक्ष प्रमोद पत्ताडे यांनी निवेदनात दिला आहे.