भाईंदर पोलिसांच्या ताब्यातून मोबाईल चोर बेडीसह पसार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2021 11:12 PM2021-10-14T23:12:47+5:302021-10-14T23:58:18+5:30
पोलिसांनी त्यात दुर्गेश प्रेमचंद गुप्ता (२०) ह्या आरोपीला अटक करून आज गुरुवारी ठाणे न्यायालयात हजर केले होते.
मीरारोड - मोबाईल चोरीत मोठ्या मेहनतीने अटक केलेला आरोपी भाईंदर पोलिसांच्या ताब्यातून बेडी सह पळून गेल्याची घटना गुरुवारी सायंकाळी भाईंदर येथे घडली आहे. भाईंदर पश्चिमेच्या गणेश देवनगर मध्ये राहणारे महेंद्र माछी यांच्या घराचे दार उघडे असल्याने चोरट्याने चार्जिंगला लावलेला मोबाईल चोरून नेल्याप्रकरणी बुधवार १३ ऑक्टोबर रोजी भाईंदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलिसांनी त्यात दुर्गेश प्रेमचंद गुप्ता (२०) ह्या आरोपीला अटक करून आज गुरुवारी ठाणे न्यायालयात हजर केले होते. ठाण्यावरून भाईंदर पोलीस ठाण्यात आणताना भाईंदर पोलीस ठाण्या पासून काही अंतरावरच असलेल्या टपाल कार्यालया जवळ पोलिसांची गाडी काहीशी धीमी झाली. त्यावेळी संधी साधत गुप्ता हा पोलिसांच्या हाताला झटका देऊन बेडीसह गाडीतून उडी मारून पळून गेला. भाईंदर पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपीचा शोध सुरू केला आहे.