तिकीट आणि ओळखपत्राच्या वादातून रेल्वेच्या टीसीला प्रवाशाची मारहाण
By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2021 09:36 PM2021-06-02T21:36:43+5:302021-06-02T21:46:28+5:30
ओळखपत्र आणि तिकीटाच्या वादातून रेल्वेच्या भरारी पथकाच्या तिकीट तपासणीलाच मारहाण करणाऱ्या कुणाल शिंदे (२०) आणि हर्षल भगत (२५) या दोघांना ठाणे रेल्वे पोलिसांनी मंगळवारी अटक केली आहे. कुणालकडे त्यांनी तिकीटाची मागणी केली तेंव्हा त्याच्याकडे दादर ते दिवा हे तिकीट नव्हते. शिवाय, त्याच्याकडे अत्यावश्यक सेवेतील कोणतेही ओळखपत्र नव्हते.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: ओळखपत्र आणि तिकीटाच्या वादातून रेल्वेच्या भरारी पथकाच्या तिकीट तपासणीलाच मारहाण करणाऱ्या कुणाल शिंदे (२०) आणि हर्षल भगत (२५) या दोघांना ठाणेरेल्वे पोलिसांनी मंगळवारी अटक केली आहे. त्यांना १६ जूनपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश कल्याण न्यायालयाने दिले आहेत.
दादर ते दिवा दरम्यान कुणाल शिंदे हा मंगळवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास प्रवास करीत होता. त्याचवेळी या उपनगरी रेल्वेत भरारी पथकातील विकास पाटील (४४) आणि गणेश देवडिगा (५३) हे तिकीट तपासणीस (टीसी) प्रवाशांचे तिकीट आणि अत्यावश्यक सेवेतील ओळखपत्र तपासणी करीत होते. कुणालकडे त्यांनी तिकीटाची मागणी केली तेंव्हा त्याच्याकडे दिवा ते दादर हे तिकीट होते. मात्र, दादर ते दिवा हे तिकीट नव्हते. शिवाय, त्याच्याकडे अत्यावश्यक सेवेतील कोणतेही ओळखपत्र नव्हते. यातूनच त्याने या टीसींबरोबर वाद घातला. नंतर त्याने दिवा स्थानकात त्याचा मित्र हर्षल यालाही बोलवून घेतले. रेल्वे दिवा स्थानकात आल्यानंतर कुणाल आणि हर्षद या दोघांनीही टीसींना मारहाण केली. याप्रकरणी ठाणे रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार खडकीकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक आशिष भगत यांच्या पथकाने या दोघांनाही अटक केली.