ठाण्यात रिक्षा अपघातात प्रवाशाचा मृत्यू, चालकासह चौघे जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2018 10:42 PM2018-05-04T22:42:35+5:302018-05-04T22:42:35+5:30
रस्त्याच्या कडेला असलेल्या एका वाहिनीवर रिक्षा आदळून झालेल्या अपघातात एका प्रवाशाचा जागीच मृत्यु झाला तर चालकासह चौघेजण जखमी झाल्याची घटना ठाण्याच्या साकेत भागात शुक्रवारी दुपारी घडली.
ठाणे : रिक्षावरील नियंत्रण सुटल्याने झालेल्या अपघातात सखाराम सीताराम बावळेकर (४१, रा. घाटकोपर, मुंबई) या प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला, तर रिक्षाचालकासह चौघे प्रवासी जखमी झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी घडली. हा अपघात बाळकुमजवळील साकेत रस्त्यावर घडला.
बाळकुम येथून ठाण्याकडे येत असताना राबोडीतील साकेत मार्गावर पाइपलाइनजवळ रिक्षाचालक मुझफ्फर तय्यब बेग (२३, रा. क्रांतीनगर, राबोडी, ठाणे) यांचे रिक्षावरील नियंत्रण सुटले. त्यामुळे रिक्षा एका जलवाहिनीवर आदळून झाड आणि वाहिनी यांच्या मधोमध शिरली. या धडकेत प्रवासी बावळेकर यांचा जागीच मृत्यू झाला, तर पूजा जाधव (२७, रा. पूर्णा गाव, भिवंडी), संतोष अमृतलाल गौतम (३२, रा. काल्हेर, भिवंडी) आणि राजेंद्र काशिनाथ अहिरे (५२, रा. गणेशवाडी, ठाणे) हे अन्य तीन प्रवासी जखमी झाले. या तिन्ही प्रवाशांना ठाण्याच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून रिक्षाचालक बावळेकर यांना कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल केले आहे. याप्रकरणी बावळेकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलीस निरीक्षक प्रदीप भानुशाली यांनी दिली.