पंच्याहत्तरी पूर्ण करणाऱ्या ठाणेकर प्रवाशांना टीएमटीतून प्रवासाची विनामूल्य सुविधा
By अजित मांडके | Published: August 24, 2022 05:33 PM2022-08-24T17:33:38+5:302022-08-24T17:36:02+5:30
वयाची 75 वर्षे पूर्ण करणाऱ्या ठाणेकर प्रवाशांना टीएमटीतून प्रवासाची विनामूल्य सुविधा देण्यात आली आहे.
ठाणे : ७५ व्या स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळापाठोपाठ ठाणे महापालिका परिवहन समितीच्या बसमधून पंच्याहत्तरी पूर्ण करणाऱ्या ठाणेकर प्रवाशांना विनामूल्य प्रवास करता येणार आहे. याबाबत परिवहन समितीने मंगळवारी झालेल्या समितीच्या सभेत एकमताने निर्णय घेतला असून या प्रवासासाठी ज्येष्ठ नागरिकांकडे टीएमटीचा (TMT)पास असणे बंधनकारक केले आहे. ज्येष्ठ नागरिकांनी दोन फोटो आणि आधार कार्डची प्रत जमा करावी असे आवाहन ही समितीने केले आहे.
स्वातंत्र्य दिनाच्या अमृतमहोत्सवी वर्षाचे औचित्य साधून मुख्यमंत्रीएकनाथ शिंदे यांनी वयाची ७५ वर्ष पूर्ण केलेल्या सर्व जेष्ठ नागरिकांना एस.टी. महामंडळाच्या बसने विनामूल्य प्रवास करण्याची सुविधा घोषित केली आहे. जेष्ठ नागरिकांप्रती विद्यमान सरकारने आपल्या कृतज्ञतेच्या भावना व्यक्त केल्या आहेत. मुख्यमंत्र्यांच्या औदार्यांचे हे उदाहरण समोर ठेवून ठाणे महापालिका परिवहन सेवेच्या सर्वसाधारण आणि वातानुकूलीत बसमधून देखील वयाची ७५ वर्ष पूर्ण केलेल्या ठाण्यातील प्रवाशांना विनामूल्य प्रवास करण्याची सवलत दयावी, असा प्रस्ताव परिवहन समिती सदस्य बालाजी काकडे यांनी मंगळवारी परिवहन समितीच्या सभेमध्ये मांडला असता, त्या ठरावाला सर्व सदस्यांनी एकमताने मंजूर देण्यात आली आहे.
TMT कडून विनामूल्य प्रवासाची सुविधा
पुढील पंधरा दिवसात वयाची ७५ वर्ष पूर्ण केलेल्या ठाणे महापालिका क्षेत्रात राहणाऱ्या सर्व प्रवाशांना ठाणे महापालिकेच्या बसेसमधून विनामूल्य प्रवास करण्याच्या सुविधेकरिता प्रशासनातर्फे पासेस देण्याची कार्यवाही सुरु करण्यात येईल. असे परिवहन व्यवस्थापक बेहेरे यांनी सांगितले. हे पासेस मिळण्याकरिता जेष्ठ नागरिकांनी आपल्या आधार कार्डची प्रत व दोन फोटो दयावेत व या सुविधेचा लाभ घ्यावा असे परिवहन समितीचे सभापती विलास जोशी यांनी सांगितले आहे.