पासपोर्ट उपकेंद्रासाठी जागेचा अडसर?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2018 03:28 AM2018-07-14T03:28:25+5:302018-07-14T03:28:36+5:30

ठाण्यातील पासपोर्ट सेवा केंद्रातील वाढती गर्दी लक्षात घेऊन डोंबिवलीतही पासपोर्ट उपकेंद्र सुरू करण्याची मागणी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी परराष्ट्र मंत्रालयाकडे केली होती. मात्र, या केंद्रासाठी परराष्ट्र मंत्रालयाला डोंबिवलीत सुसज्ज जागा मिळत नाही.

 Passport Sub-station | पासपोर्ट उपकेंद्रासाठी जागेचा अडसर?

पासपोर्ट उपकेंद्रासाठी जागेचा अडसर?

googlenewsNext

- अनिकेत घमंडी
डोंबिवली : ठाण्यातील पासपोर्ट सेवा केंद्रातील वाढती गर्दी लक्षात घेऊन डोंबिवलीतही पासपोर्ट उपकेंद्र सुरू करण्याची मागणी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी परराष्ट्र मंत्रालयाकडे केली होती. मात्र, या केंद्रासाठी परराष्ट्र मंत्रालयाला डोंबिवलीत सुसज्ज जागा मिळत नाही. तसेच तांत्रिक अडचणींमुळे हा प्रस्ताव प्रलंबित ठेवला आहे, अशी माहिती पासपोर्ट विभागाच्या अधिकाऱ्यांनी ‘लोकमत’ला दिली.
डोंबिवलीत पासपोर्ट उपकेंद्र सुरू करावे, या मागणीसाठी शिंदे यांनी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्याकडे पत्रव्यवहार करत त्यांची भेट घेतली होती. त्यावेळी त्यांनी डोंबिवलीत उपकेंद्र सुरू करण्यास सकारात्मकता दर्शवली होती. परंतु, एका पासपोर्ट केंद्रापासून २५ किलोमीटर अंतराच्या आत दुसरे केंद्र सुरू करता येत नाही. डोंबिवलीत हे केंद्र सुरू करण्यासाठी टपाल कार्यालयाचे मुख्य कार्यालय आणि सुसज्ज जागाही नाही. शिवाय, पासपोर्ट केंद्राची यंत्रणा राबवण्यासाठीच्या नियमांची पूर्तता होत नसल्याची तांत्रिक अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे डोंबिवलीतही उपकेंद्र सुरू करता येत नसल्याचा व्यवहार्यता (फिजिबिलिटी) अहवालही पाठवण्यात आल्याचे सांगण्यात आले.
डोंबिवलीच्या प्रस्तावादरम्यान विक्रोळी येथेही पासपोर्ट उपकेंद्र सुरू करण्याचा प्रस्ताव गेला होता. तेथे हे केंद्र सुरू झाले आहे. रत्नागिरी परिसरातही उपकेंद्र सुरू करण्याचा विचार आहे. पण, असे असतानाही डोंबिवलीतील केंद्र सुरू करण्यासाठी हालचाली मंदावल्या आहेत.

डोंबिवलीत एमआयडीसी परिसरातील टपाल कार्यालयात मुबलक जागा आहे. त्या जागेचे फोटो तसेच पत्रव्यवहार परराष्ट्र मंत्रालयाशी केला आहे. नागरिकांच्या सोयीसाठी डोंबिवलीत पासपोर्ट उपकेंद्रासाठी पाठपुरावा करून ते लवकरच सुरू केले जाईल.
-डॉ. श्रीकांत शिंदे, खासदार

Web Title:  Passport Sub-station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.