एसटी डेपोंत ‘पाताललोक’, ठाण्यात गर्दुल्ले, मद्यपी यांच्या पार्ट्या : बाहेरगावाहून आलेल्या महिला, मुली हेच ठरतात लक्ष्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2025 09:10 IST2025-03-01T09:10:04+5:302025-03-01T09:10:24+5:30
ठाणे शहरातील खोपट, वंदना आणि ठाणे स्टेशन डेपोत गर्दुल्ल्यांनी चक्क कुटुंबासोबत संसार थाटले आहेत. डोंबिवलीतील जिमखाना येथील डेपोच्या परिसरात शाळा, खासगी बसगाड्या उभ्या राहतात व त्याच्या आडोशाला मद्यपी, गर्दुल्ले यांच्या पार्ट्या रात्री रंगतात.

एसटी डेपोंत ‘पाताललोक’, ठाण्यात गर्दुल्ले, मद्यपी यांच्या पार्ट्या : बाहेरगावाहून आलेल्या महिला, मुली हेच ठरतात लक्ष्य
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : पुण्यातील स्वारगेट येथे एका तरुणीवर एसटी डेपोच्या परिसरात बलात्कार झाल्याने समाजमन हेलावले. मात्र, ठाणे जिल्ह्यातील वेगवेगळ्या शहरांमधील एसटी डेपोंमध्ये कधीही अशीच एखादी गुन्हेगारी स्वरुपाची घटना घडू शकते इतकी भीषण परिस्थिती आहे.
ठाणे शहरातील खोपट, वंदना आणि ठाणे स्टेशन डेपोत गर्दुल्ल्यांनी चक्क कुटुंबासोबत संसार थाटले आहेत. डोंबिवलीतील जिमखाना येथील डेपोच्या परिसरात शाळा, खासगी बसगाड्या उभ्या राहतात व त्याच्या आडोशाला मद्यपी, गर्दुल्ले यांच्या पार्ट्या रात्री रंगतात.
कल्याण रेल्वेस्थानकाबाहेरील एसटी स्टँडचे नूतनीकरण सुरू असल्याने तेथे ना सीसीटीव्ही आहेत, ना पोलिस चौकी. या परिसरात रात्री वारांगना, तृतीयपंथी, चोरटे यांचा खुलेआम वावर असतो. वर्दळीची वेळ सोडली तर दुपारी आणि रात्री महिला, मुलींनी तर एसटी डेपोच्या परिसरात पाऊल ठेवू नये, अशीच ठाण्यात परिस्थिती आहे. पुण्यातील घटनेमुळे राज्यातील एसटी डेपोंची किती दुरवस्था असेल, याची प्रचिती येते.
खराब स्वच्छतागृहे
ठाणे जिल्ह्यातील वेगवेगळ्या शहरांमधील मध्यमवर्ग, उच्च मध्यमवर्ग यांनी एसटी प्रवास कमी केला आहे. एकतर हा वर्ग स्वत:च्या मोटारी घेऊन कोकणापासून कोल्हापूर, सोलापूर किंवा अगदी समृद्धी महामार्गावरून नागपूरपर्यंत जाऊ शकतो.
एसटी बसच्या खडखडाटापेक्षा चार पैसे जास्त मोजून लक्झरी स्लिपर क्लासने जाण्याचा पर्याय या प्रवाशांनी स्वीकारला आहे. परिणामी अत्यंत गोरगरीब वर्ग किंवा ज्यांना दररोज प्रवास अपरिहार्य आहे असा वर्ग एसटीचा वापर करतो.
त्यामुळे एसटी डेपोंकडे दुर्लक्ष झाले आहे. एसटीची आर्थिक स्थिती खराब आहे. त्याचाही फटका सुविधांना बसला आहे. तुटकी आसने, खराब स्वच्छतागृहे यामुळे प्रवासी प्रवास टाळतात.
घरी जायला एसटीच, पण...
ठाणे व कल्याण ही रेल्वे प्रवासाची मोठी केंद्र आहेत. देशाच्या अन्य भागातील मेल, एक्स्प्रेस गाड्या मध्यरात्री या दोन स्टेशनवर प्रवाशांना सोडतात.
येथून प्रवासी मीरा-भाईंदर, विरार, नालासोपारा,भिवंडी, उल्हासनगर, डोंबिवली वगैरे शहराकडे जातात. कल्याण व ठाणे स्थानकाबाहेर एसटी डेपो आहेत. रात्री उतरणाऱ्या प्रवाशांचा गैरफायदा रिक्षाचालक घेतात.
अव्वाच्या सव्वा भाडे आकारतात. त्यामुळे गरीब प्रवाशांना घर गाठण्यासाठी एसटीचाच पर्याय असतो. डेपो परिसरात गर्दुल्ले, मद्यपी,भामट्यांचा वावर असतो. त्यामुळे पुण्यापेक्षा ठाण्याची परिस्थिती वेगळी नाही, असे प्रवाशांचेच म्हणणे आहे.