कचरागाड्या फिरकत नसल्याने गृहसंकुलांपुढे पेच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 04:40 AM2021-03-10T04:40:08+5:302021-03-10T04:40:08+5:30
कल्याण : दररोज १०० किलोपेक्षा अधिक कचरा निर्माण होणाऱ्या गृहसंकुलांनी स्वत:च त्यांच्या कचऱ्याची विल्हेवाट लावावी, असे आदेश कल्याण-डोंबिवली मनपाने ...
कल्याण : दररोज १०० किलोपेक्षा अधिक कचरा निर्माण होणाऱ्या गृहसंकुलांनी स्वत:च त्यांच्या कचऱ्याची विल्हेवाट लावावी, असे आदेश कल्याण-डोंबिवली मनपाने काढले आहेत. मात्र, दोन्ही शहरांतील बहुतांश गृहसंकुले जुनी असून कचऱ्यावर प्रक्रिया करणारा प्रकल्प राबवण्यासाठी त्यांच्याकडे जागा नाही. त्यामुळे विलंब होत असताना दुसरीकडे केडीएमसीकडून नोटिसांचा सिलसिला सुरूच आहे. यात आता कचऱ्याच्या गाड्या चार ते पाच दिवस न पाठवता अडवणूक केली जात असल्याचा आरोप गृहसंकुलांकडून होत आहे.
केडीएमसीने नागरिकांना ओला कचरा व सुका कचरा स्वतंत्रपणे कचरागाडीत देणे बंधनकारक केले आहे. तसेच दररोज १०० किलोपेक्षा जास्त कचरा निर्माण होणाऱ्या गृहसंकुलांनी त्यांच्या ओल्या कचऱ्याची विल्हेवाट सोसायटीच्या आवारातच शास्त्रोक्त पद्धतीने करण्याची सक्ती केली आहे. तर, सुका कचरा दररोज किंवा बुधवार व रविवारी प्रभागात नेमलेल्या एजन्सीकडे देण्यास सांगितले आहे. मात्र, गृहसंकुलांमध्ये पुरेशी जागा नसल्याने प्रकल्प राबविण्यास मर्यादा येत आहेत. तसेच खर्च मोठा असल्याने प्रकल्प राबवायचा कसा, असाही यक्षप्रश्न आहे.
त्यातच दुसरीकडे नोटीस मिळाल्यापासून १५ दिवसांत त्याप्रमाणे कार्यवाही करावी अन्यथा आपला कचरा स्वीकारला जाणार नाही, असा पवित्रा मनपाने घेतला आहे. मनपाच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त रामदास कोकरे हे गृहसंकुलांना मार्गदर्शन करीत आहेत. प्रकल्प राबविण्याची तयारी गृहसंकुलांनी केली आहे. परंतु, जागेची समस्या असल्याने तसेच हा प्रकल्प खर्चिक असल्याने एकूणच या प्रक्रियेला काहीसा विलंब लागण्याची शक्यता आहे. मात्र, त्याआधीच कचरा घेण्यासाठी येणाऱ्या गाड्याही आठवड्यातून चार ते पाच दिवस गृहसंकुलांकडे फिरकत नसल्याने रहिवासी त्रस्त झाले आहेत. ओला कचरा दररोज डम्पिंगवर नेणे आवश्यक असताना नेला जात नाही. त्यामुळे तो साचून राहत असल्याने दुर्गंधी येत आहे. यासंदर्भात कोकरे यांच्याशी ‘लोकमत’ने संपर्क साधला असता त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही.
------------
जागेअभावी प्रकल्प राबविण्यास मर्यादा आहेत. गृहसंकुल उभारणाऱ्या बिल्डरशीही आमची चर्चा सुरू आहे. प्रकल्प राबविण्यासाठी आम्ही तयार आहोत, परंतु तत्पूर्वीच कचऱ्याच्या गाड्या पाठविणे बंद केल्याने चार ते पाच दिवस कचरा गृहसंकुलाचा कचरा नेला जात नाही. आधीच कोरोनाचे संकट वाढत असताना कचरा वेळच्यावेळी उचलला जात नसल्याने आरोग्याचा प्रश्न अधिक गहन बनला आहे.
- लक्ष्मण इंगळे, सचिव, सर्वाेदय लीला सोसायटी, ठाकुर्ली
-----------------