जुन्या ठाण्याचा विकासाचा मार्ग अखेर मोकळा; शिवसेना अन् भाजपमध्ये श्रेयवादाची लढाई
By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2020 02:35 PM2020-11-25T14:35:41+5:302020-11-25T14:35:53+5:30
६ मीटरचा रस्ता होणार ९ मीटर, धोकादायक इमारतींचा पुनर्विकासाचा मार्गही मोकळा
ठाणे : ठाणे शहरातील तब्बल २१ रस्ते ९ मीटरचे करण्याचा प्रस्ताव मंजुर होऊनही तो शासनाकडे पाठविण्यात आला होता. अखेर दोन वर्षानंतर या प्रस्तावाला मंजुरी मिळाली आहे. यामुळे आता येथील ६ मीटरचे रस्ते ९ मीटरचे होणार असून धोकादायक आणि अतिधोकादायक इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्नही या निमित्ताने मार्गी लागला आहे. एकनाथ शिंदे यांचे खाते असलेल्या नगरविकास विभागाने या प्रस्तावाला हिरवा कंदील दिला असल्याची माहिती महापौर नरेश म्हस्के यांनी दिली आहे. परंतु आम्ही केलेल्या सततच्या पाठपुराव्यामुळेच नगरविकास विभागाला हा प्रस्ताव मंजुर करावा लागला असा दावा भाजपच्या वतीने आमदार संजय केळकर यांनी केला आहे.
ठाणे महापालिका क्षेत्रतील घोडबंदर, कळवा, मुंब्रा तसेच अन्य परिसरात मोठी गृहसंकुले उभी राहत असून यामुळे या भागाचे गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात नागरिकरण झाले आहे. असे असले तरी ठाणो शहराचा मध्यवर्ती परिसर असलेल्या नौपाड्यातील जुन्या इमारतींचा मात्र पुर्नविकास रखडल्याचे चित्र आहे. इमारतीभोवती ९ मीटरचा रस्ता नसेल तर पुनर्विकासासाठी विकास हस्तांतरण हक्क (टीडीआर) देता येणार नाही, अशी भूमिका राज्य सरकारने नव्या टिडीआर धोरणात घेतली होती. या धोरणामुळे जुन्या ठाण्यातील ब्राह्मण सोसायटी, भास्कर कॉलनी, उथळसर, कोलबाड, विष्णूनगर, बी-कॅबीन, चरई आणि राबोडी या भागात सहा मीटरपेक्षा कमी रुंदीचे रस्ते आहेत. त्यामुळे या भागातील जुन्या इमारतींना टिडीआर मिळण्याचा मार्ग बंद झाल्याने त्यांचा पुनर्विकास गेल्या काही वर्षांपासून रखडला होता. या इमारतींच्या पुनर्विकासाला चालना देण्यासाठी प्रशासनाने येथील २१ रस्ते ९ मीटरचे करण्याचा निर्णय घेतला होता.
महापालिका विकास आराखड्यात ९ मीटरचे रस्ते दर्शविण्यासाठी प्रशासनाने प्रस्ताव तयार केले होते. या प्रस्तावास महासभेने २०१८ रोजी मान्यता दिली होती. त्यानंतर हरकती सुचना मागविण्यात आल्या होत्या. दरम्यान आता या प्रस्तावाला नगरविकास विभागाने हिरवा कंदील दाखविला असल्याची माहिती महापौर म्हस्के यांनी दिली. राज्यशासनाने घेतलेल्या या निर्णयामुळे मागील कित्येक वर्षे रखडलेल्या येथील जुन्या मोडकळीस आलेल्या धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग आता मोकळा होणार आहे.
नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी या निर्णयावर शिक्कामोर्तब करुन जुन्या ठाण्याच्या विकासाची वाट मोकळी करुन दिली असल्याचेही त्यांनी सांगितले. परंतु आता शिवसेना आणि भाजपमध्ये या मंजुर झालेल्या प्रस्तावावरुन कलगीतुरा रंगला असून भाजपच्या मते आम्ही केलेल्या पाठपुराव्यामुळेच हा प्रस्ताव मंजुर झाल्याचा दावा करण्यात आला आहे. तर आम्हीच हा प्रस्ताव तयार केला आम्ही तो मंजुर करुन घेतल्याचा दावा शिवसेनेच्या वतीने करण्यात आला आहे.
सत्ताधाऱ्यांना जुन्या ठाण्याचा पुनर्विकास नको होता - संजय केळकर
जुन्या ठाण्याच्या पुनर्विकासाचा हा प्रस्ताव काही महिने महापालिका प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांनी आपल्याकडेच ठेवला होता. भाजपच्या माध्यमातून पाठपुरावा केल्यानंतर आता हा प्रस्ताव शासनाने मंजुर केला आहे. सचिवांबरोबर तीन वेळा मिटींगसुध्दा घेतल्या होत्या. सत्ताधाऱ्यांना हा प्रस्ताव मंजुर करायचा नव्हता, त्यांना जुन्या ठाण्याचा पुनर्विकास करायचा नव्हता. परंतु आम्ही सतत पाठपुरावा केल्यानेच नगरविकास विभागाला हा निर्णय घेणो भाग पडले आहे. (संजय केळकर - आमदार, भाजप)
दुसऱ्याच्या मुलाला बाप म्हणून स्वत:चे नाव लावण्याचा प्रयत्न करु नये - नरेश म्हस्के
देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री आणि नगरविकास खाते त्यांचेकडे होते, तेव्हा त्यांनी याला का मंजुरी दिली नाही, याचे उत्तर भाजपने आधी द्यावे. प्रस्ताव तयार झाल्यानंतर भाजपच्या नगरसेवकांमुळेच हा प्रस्ताव राज्यशासनाकडे पाठविण्यास उशिर झाला होता. हा रस्ता नको तो रस्ता घ्या, असे त्यांचे नगरसेवकच सांगत होते. परंतु भाजपला केवळ फुकटचे श्रेय घ्यायचे असते. आम्ही हा प्रस्ताव तयार केला, आम्ही तो राज्यशासनाकडे पाठविला आम्हीच तो मंजुर करुन घेतला. त्यामुळे दुसऱ्याच्या मुलाला स्वत:चा बाप म्हणून नाव लावण्याचा प्रयत्न करु नये. (नरेश म्हस्के - महापौर, ठामपा)