जिल्ह्यातील मराठी शाळांची पाटी कोरी; राष्ट्रीय पातळीवर मराठी माध्यमाच्या प्रकल्पाचा समावेश नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2019 02:29 AM2019-12-10T02:29:50+5:302019-12-10T02:29:57+5:30
भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागातर्फे दरवर्षी राष्ट्रीय बालविज्ञान परिषद आयोजिली जाते.
ठाणे : डिसेंबरमध्ये होणाऱ्या राष्ट्रीय बालविज्ञान परिषदेसाठी राज्यस्तरीय परिषद नुकतीच पुण्यात पार पडली. एकूण ३० प्रकल्पांची राष्ट्रीय पातळीसाठी निवड झाली असून यात ठाणे जिल्ह्यातील केवळ तीनच प्रकल्प निवडले गेले असून ते तीनही इंग्रजी माध्यमांचे आहेत. मुख्य म्हणजे जिल्ह्यातील एकाही मराठी माध्यमाच्या प्रकल्पाची निवड झालेली नसून गेल्या २७ वर्षांत प्रथमच असे घडल्याने ठाणे जिल्ह्यातील मराठीशाळांची पाटी कोरी राहिली आहे.
भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागातर्फे दरवर्षी राष्ट्रीय बालविज्ञान परिषद आयोजिली जाते. यंदाची ही २७ वी राष्ट्रीय बालविज्ञान परिषद आहे. जिल्हास्तरीय फेरीतून ठाणे जिल्ह्यातील १६ प्रकल्प राज्यपातळीवर सादर केले गेले. ६ ते ८ डिसेंबरदरम्यान राज्यस्तरीय परिषद पुण्यात बेल्हा येथे झाली. यात ठाण्यातील १२ प्रकल्प हे इंग्रजी, तर चार प्रकल्प मराठी माध्यमाचे होते. या परिषदेतून राष्ट्रीय पातळीसाठी ठाणे जिल्ह्यातील तीन प्रकल्पच निवडले गेले आहेत.
यापूर्वी राज्यातून ठाणे जिल्ह्यातील सर्वाधिक प्रकल्प राष्ट्रीय स्तरासाठी निवडले जायचे. यंदा तीन प्रकल्पच निवडले गेल्याने ठाण्याच्या शैक्षणिक वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात आहे. यातही निवडलेले तीन प्रकल्प हे इंग्रजी माध्यमातील आहेत. श्रीमती सुलोचनादेवी सिंघानिया हायस्कूलचे दोन, तर के.ई.एस. भगवती विद्यालयाचा एक असे तीन प्रकल्प आहेत. राष्ट्रीय पातळीसाठी ठाणे जिल्ह्यातील एकाही मराठी विज्ञान प्रकल्पाची निवड न होणे ही बाब मराठी शाळांच्या दृष्टीने चिंताजनक आहे.
यापूर्वी राष्ट्रीय पातळीसाठी निवड झालेल्या प्रकल्पात ठाणे जिल्ह्यातील सर्वाधिक प्रकल्प तसेच त्यात मराठी माध्यमाच्या प्रकल्पांचा समावेश असायचा. मात्र, गेल्या २७ वर्षांत प्रथमच ठाण्यातील मराठी शाळा विज्ञान परिषदेत मागे पडल्या आहेत, अशी माहिती राज्य पातळीचे आयोजक जिज्ञासा ट्रस्टचे विश्वस्त सुरेंद्र दिघे यांनी दिली.
इंग्रजी शाळांच्या तुलनेत मराठी शाळांतील शिक्षक आणि पालकांची उदासीनता याला कारणीभूत आहे. मुलांमध्ये सहभागी होण्याचा उत्साह असतो, मात्र शिक्षक व पालकांमध्ये तो फारसा नसतो. हे विज्ञान प्रकल्प मुलांच्या अभ्यासक्रमाचा भाग नाही, परीक्षेसाठी नाही. त्यामुळे यात त्यांचा वेळ फुकट जातो, या हेतूने पालक मुलांना त्यात सहभागी होण्यास प्रोत्साहन देत नाही आणि शिक्षकही याचे महत्त्व पालकांना समजावून सांगत नाहीत. याचाच परिणाम मराठी माध्यमांच्या प्रकल्पाच्या गुणवत्तेवर आणि निवडीवर झालेला आहे, असे मत दिघे यांनी व्यक्त केले.