कॅन्सरचा बाऊ न करता डाॅक्टरकडून रुग्णसेवा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2021 12:09 AM2021-05-03T00:09:16+5:302021-05-03T00:11:26+5:30
कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या काळात डाॅक्टरांसह वैद्यकीय साहित्याची कमतरता लक्षात घेऊन डाॅ. राठोड यांनी कर्तव्याला प्राधान्य दिले
सुरेश लोखंडे
ठाणे : सध्याच्या कोरोना संसर्गाचा काळ भल्याभल्यांसाठी जीवघेणा ठरत आहे. या संवेदनशील काळात कल्याण तालुक्यातील निळजे प्राथमिक आरोग्य केंद्राचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डाॅ. रमेश राठोड यांनी कर्करोगावर मात करून कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणासह रुग्णसेवा सुरूच ठेवली आहे. वडिलांच्या स्मृतीदिनाच्या खर्चाची रक्कम रुग्णांचे चहापान, अल्पोपाहारावर खर्च केली आहे.
कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या काळात डाॅक्टरांसह वैद्यकीय साहित्याची कमतरता लक्षात घेऊन डाॅ. राठोड यांनी कर्तव्याला प्राधान्य दिले. वडील हभप नामदेव महाराज यांच्या पुण्यतिथीच्या कार्यक्रमाचा निधी आरोग्य केंद्रातील रुग्ण व लसीकरणास येणाऱ्या ग्रामस्थांचे दैनंदिन चहापाणी व अल्पोपाहारावर खर्च करून समाधान मिळत असल्याचे त्यांनी व त्यांचे स्नेही डाॅ. अविनाश भागवत यांनी सांगितले. यात बीड येथील त्यांची प्राध्यापक बहीण डॉ. ललिता राठोड यांनीही साथ दिली. वडिलांच्या पुण्यतिथीचा गावाकडील कार्यक्रम रद्द करून त्याची रक्कम त्यांनी डॉ. राठोड यांच्याकडे सुपुर्द करीत ज्येष्ठ नागरिकांच्या सेवेत खारीचा वाटा उचलला. डाॅ. राठोड लातूर जिल्ह्यातील उजनी तांडा (ता.औसा) येथील भूमिपुत्र आहेत. ठाणे जिल्हा परिषदेच्या या आरोग्य केंद्रावर गावपाड्यांचेे ज्येष्ठ नागरिक, आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाईन वर्कर आदींना डॉ. राठोड यांच्या सेवेचा लाभ मिळत आहे. त्यांच्या या उपक्रमाला कल्याण येथील मुथा प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रकाश मुथा, स्थानिक नगरसेवक रवी म्हात्रे, लालचंद भोईर, निळजे येथील प्रकाश पाटील, कल्याण रनर्स सचिन सालीयन यांची मदत मिळाली असल्याचे डाॅ. राठोड सांगतात.
वडिलांच्या समाजसेवेचा वारसा जपला!
ठाणे : लातूर जिल्ह्यातील उजनी तांड्याजवळील एकंबी तांडा येथील हभप नामदेव महाराज म्हणजेच नामदेव जगन्नाथ राठोड यांचे ४७ वर्षांपूर्वीच देहावसान झाले. त्यांचे सामाजिक, शैक्षणिक आणि धार्मिक कार्य अलौकिक होते. या कार्याची येथील ग्रामस्थांनी दखल घेऊन लोकसहभागातून एकंबी गावात नामदेव महाराजांचे मंदिर बांधले. प्रत्येक वर्षी चैत्र महिन्यातील हनुमान जयंतीला गावातील सर्व भाविक व ज्येष्ठ नागरिक एकत्र येऊन नामदेव महाराजांच्या पुण्यतिथी कार्यक्रम आयोजित केला जातो.