ठाण्यातील ग्लोबल रुग्णालयातून पेशंट केअर टेकरने केली मोबाइलची चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:52 AM2021-06-16T04:52:22+5:302021-06-16T04:52:22+5:30
ठाणे : ठाणे महापालिकेच्या ग्लोबल रुग्णालयात दाखल असलेल्या कोरोना रुग्णाचा मोबाइल चोरी झाल्याचा गुन्हा शनिवारी दाखल झाला आहे. याच ...
ठाणे : ठाणे महापालिकेच्या ग्लोबल रुग्णालयात दाखल असलेल्या कोरोना रुग्णाचा मोबाइल चोरी झाल्याचा गुन्हा शनिवारी दाखल झाला आहे. याच रुग्णालयातील पेशंट केअर (पीसी) दीपक सावंत (२५) यानेच तो चोरल्याचे उघड झाले आहे. यापूर्वीही अशाच प्रकारच्या एका गुन्ह्यात तो अटकेत आहे. या गुन्ह्यामध्ये त्याचा न्यायालयातून ताबा घेणार असल्याचे कापूरबावडी पोलिसांनी सांगितले.
पाचपाखाडीतील गणेशवाडी येथे राहणारे ओमकार फडणीस यांचे वडील सुरेश फडणीस (६०) हे ग्लोबल रुग्णालयात कोविडवरील उपचारासाठी दाखल होते. त्यांच्यावर १६ ते २२ एप्रिल २०२१ या काळात उपचार सुरू होते. मात्र, दुर्दैवाने त्यांचा मृत्यू झाला. मृत्यूनंतर त्यांचा मोबाइल मिळू शकला नाही. या कुटुंबाने बरीच शोधाशोध केली. अखेर याप्रकरणी त्यांनी १२ जून रोजी कापूरबावडी पोलीस ठाण्यात चोरीची तक्रार दाखल केली. दरम्यान, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय पाटील, सहायक पोलीस निरीक्षक विष्णू आव्हाड यांच्या पथकाने या प्रकरणाचा तपास केला असता यात याच रुग्णालयाचा हंगामी कर्मचारी दीपक सावंत याचे नाव समोर आले. दीपक याला यापूर्वीच कापूरबावडी पोलिसांनी अन्य एका रुग्णाच्या मोबाइल चोरीप्रकरणी अटक केली आहे. तो सध्या न्यायालयीन कोठडीत असल्यामुळे त्याला ठाणे जिल्हा मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात आले आहे. त्याचा लवकरच न्यायालयाकडून ताबा घेणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक देशमुख यांनी दिली.