रस्त्याअभावी खेडोपाड्यात रुग्णांचे हाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2020 12:12 AM2020-09-23T00:12:16+5:302020-09-23T00:12:21+5:30

रुग्णांना डोलीचा आधार : डोंगरदरीचा खडतर प्रवास करून न्यावे लागते रुग्णालयात

Patient condition in rural areas due to lack of roads | रस्त्याअभावी खेडोपाड्यात रुग्णांचे हाल

रस्त्याअभावी खेडोपाड्यात रुग्णांचे हाल

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
जव्हार : जव्हारहून अवघ्या २५ ते ३० कि.मी. अंतरावर डोंगर दरीखोऱ्यात वसलेले दखण्याचापाडा, वडपाडा, उंबरपाडा, मनमोहाडी, भाटीपाडा, कुकडी हे आदिवासी पाडे आजही सोयी-सुविधांपासून कोसो दूर आहेत. स्वातंत्र्याची ७० वर्षे उलटूनही अद्याप या गावपाड्यांत दळणवळणाची सोय नसल्याने येथील आदिवासींना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे.


रस्त्याअभावी अबालवृद्ध, गरोदर माता, शाळकरी मुले चाकरमान्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे तसेच आजारी रुग्णाला लाकडाची डोली करून ६ ते ७ किमीचा भलामोठा डोंगर तुडवत झाप येथील प्राथमिक आरोग्य केंद्र गाठावे लागते, मात्र तेथेही जास्त सुविधा नसल्यामुळे २५ किमीचे अंतर प्रवास करून जव्हारच्या कुटीर रुग्णालयात यावे लागते. दरम्यान, प्रवासी वाहन वेळेवर उपलब्ध न झाल्यामुळे अनेक रुग्णांना उपचाराअभावी जीव गमवावा लागत आहे. यामुळे येथील आदिवासींच्या पाचवीला पुजलेली ही मरणयातना कधी थांबणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
या भागात सर्पदंशमुळे शेकडो निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. किमान एकदिवसआड जव्हार येथील कुटीर रुग्णालयात सर्पदंश झालेले रुग्ण उपचारासाठी येतात. यातील काहींवर उपचार होऊन बरे होतात, तर काहींना आपला जीव गमवावा लागतो. मागील वर्षी ढवळू रामू गरेल व चांगुणा काकड गरेल यांना सर्पदंश होऊन वेळीच उपचार न मिळाल्यामुळे दुर्दैवी मृत्यू झाले होते, तसेच मृत्यूची नोंद न झालेल्या रुग्णांची संख्याही मोठी आहे.

आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून ७३ वर्ष उलटी आहेत, परंतु अजूनपर्यंत दखण्याचापाडा, वडपाडा, उंबरपाडा, मनमोहाडी, भाटीपाडा कुकडी हे आदिवासी पाडे सोयी-सुविधांपासून वंचित आहेत. दळणवळणाची सुविधा नाही. या आदिवासीपाड्यात नेटवर्क नसल्याने, मुले आॅनलाइन शिक्षण कसे घेणार? रुग्णाला डोली करून खांद्यावर घेऊन डोंगर चढावा लागतो. लोकप्रतिनिधी इकडे फिरकतदेखील नाहीत.
- एकनाथ दरोडा,
सामाजिक कार्यकर्ता

Web Title: Patient condition in rural areas due to lack of roads

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.