बोगस डॉक्टरांमुळे रुग्णांचे मृत्यू? निरंजन डावखरेंचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2020 01:03 PM2020-10-21T13:03:22+5:302020-10-21T13:04:21+5:30
बाळकूम येथील कोविड रुग्णालयात इंटर्नशिप पूर्ण न केलेले दोन व एक विद्यार्थी अशा तिघा डॉक्टरांची एमबीबीएस डॉक्टर म्हणून नियुक्ती केली होती.
ठाणो : महापालिकेच्या कोविड रुग्णालयातील तिघा बोगस डॉक्टरांमुळे अनेक रुग्णांचा जीव गेला असावा, अशी भीती भाजपचे आमदार व जिल्हाध्यक्ष निरंजन डावखरे यांनी व्यक्त केली आहे. या प्रकरणात संबंधित डॉक्टरांच्या कागदपत्रांची छाननी न करताच नियुक्ती करण्यासाठी मान्यता देणाऱ्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.
बाळकूम येथील कोविड रुग्णालयात इंटर्नशिप पूर्ण न केलेले दोन व एक विद्यार्थी अशा तिघा डॉक्टरांची एमबीबीएस डॉक्टर म्हणून नियुक्ती केली होती. महापालिकेच्या बेफिकीर कारभारामुळे तेथे बोगस डॉक्टरांची नियुक्ती केली जाते. या डॉक्टरांमुळे काही रुग्णांना जीव गमवावा लागला असेल, अशी शक्यता आहे.
यामुळे या प्रकरणात संबंधित डॉक्टरांच्या नियुक्ती प्रक्रियेतील सहभागी अधिकारी व कंत्राटदार कंपनीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.